नवी दिल्ली : अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांचा भारत आणि यूएई दौरा सोमवारपासून सुरू होत आहे. ते सोमवारी संध्याकाळी भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते भारतातील विविध सरकारी संस्थांच्या प्रमुखांना भेटणार आहेत. यावेळी, नासा आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांची संयुक्त मोहीम ‘निसार’ उपग्रह चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहे. दोन्ही देश नावीन्यपूर्ण आणि संशोधनासाठी द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर देतील. तसेच ते बेंगळुरूमधील निसार मिशन चाचणी साइटला भेट देणार आहेत. हे मिशन २०२४ मध्ये सुरू केले जाणार असून निसार म्हणजेच नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार ही या दोघांमधील पहिली उपग्रह मोहीम आहे.
पृथ्वीचे बदलते हवामान, पृष्ठभाग, बर्फाच्छादित क्षेत्रे, जंगले, नैसर्गिक आपत्ती, समुद्राची वाढती पातळी आणि घटणारी भूजल पातळी यांची माहिती देईल. या माध्यमातून हवामान बदलाचे धोके कमी करून शेतीचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नासाने एका निवेदनात म्हटले आहे की, अंतराळातील मानवी मोहिमांवर आणि पृथ्वी विज्ञानाशी संबंधित क्षेत्रांवरही चर्चा होणार आहे. उभय देशांमधील उदयोन्मुख आणि प्रमुख तंत्रज्ञानाबाबत सहकार्याच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या चर्चेची सुरवात केली होती.