17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिक भारतीय जनता पक्षातील नाराजी ‘मविआ’च्या पथ्यावर!

नाशिक भारतीय जनता पक्षातील नाराजी ‘मविआ’च्या पथ्यावर!

मतदार संघाचा आढावा

नाशिक : विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची पहिली यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर केली. उमेदवारांची घोषणा करण्यात भाजपनं आघाडी घेतलेली आहे. पण आता भाजपला अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागत आहे. नाराजीच्या ‘लाटा’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर धडकत आहेत. असंतुष्टांची समजूत काढण्याचे काम त्यांच्याकडून सुरु आहे. नाशिक पश्चिममध्ये भाजपनं डझनभर इच्छुकांना डावलून विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पुन्हा संधी दिली. त्यामुळे या मतदारसंघात भाजपमध्ये मोठी बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

नाशिक पश्चिममधून निवडणूक लढविण्यास तब्बल डझनभर इच्छुक होते. पण पहिली यादी येताच सगळ्यांचा हिरमोड झाला. दोन टर्मपासून आमदार असलेल्या सीमा हिरे यांना पक्षाने पुन्हा संधी दिली. त्यामुळे हिरे समर्थक आनंदात असले, तरी इच्छुकांच्या गोटात नाराजी आहे.

नाशिक पश्चिममध्ये सलग तिस-यांदा हिरे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांपैकी चार जणांनी बंडखोरीची तयारी केली. दिनकर पाटील, प्रदीप पेशकार, शशिकांत जाधव यांनी उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. ही भाजपांतर्गत नाराजी ‘मविआ’च्या पथ्यावर पडू शकते.

२०१४ मध्ये सीमा हिरे नाशिक पश्चिममधून भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा विजयी झाल्या. त्यावेळी त्यांनी सेनेच्या सुधाकर बडगुजर यांचा पराभव केला होता. जवळपास ३० हजार मतांनी त्या विजयी झाल्या होत्या. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपूर्व हिरे यांनी सीमा हिरेंना चांगली लढत दिली. त्यांनी ६८ हजारांहून अधिक मतं घेतली. पण सीमा हिरे ९ हजार ७४६ मतांनी विजयी झाल्या. आता त्या विजयी हॅट्ट्रिकसाठी सज्ज झाल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR