नाशिक : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे परिसरात करण उमेश चौरे(१७, रा. संत कबीर नगर) या युवकाची सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळक्याने डोक्यात दगड व फर्शी घालून निघृण हत्या करण्यात आली होती. जुन्या वादातूनच ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात होता. गुन्हे शोध पथकाच्या युनिट-१ ने याप्रकरणी दोन विधी संघर्षित बालकांसह तिघांना ताब्यात घेतले होते.
आता आरोपींच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयत करण चौरे याच्यावर गंगापूर हद्दीतील अरुण बंडी याच्या खुनाच्या गुन्ह्यात सामील असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. आठवडाभरापूर्वी तो सुधारगृहातून बाहेर आला होता. स्वत:च्या जीवाला धोका असल्याची माहिती त्याने आपल्या पालकांना दिली होती. त्यामुळे तो सिडकोतील कामटवाडे येथे एका मित्राकडे राहायला गेला होता.
डोक्यात दगड घालून युवकाची हत्या
सोमवारी दुपारच्या दरम्यान स्मशानभूमी रोडने जात असताना पाच ते सहा संशयितांनी त्याचा पाठलाग करत रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्याच्या डोक्यात दगड व फर्शी मारण्यात आल्याने गंभीर इजा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर बंडीच्या खुनाचा बदला घेतला, असे काही जण म्हणत होते तर काही जण खून का बदला खून म्हणत होते. सर्व संशयीत जल्लोष करत घटनास्थळावरून फरार झाले होते.
खून का बदला खून
यानंतर अंबड पोलिसांसह परिमंडळ-२ च्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांनी घटनास्थळी पाहणी केली. अंबड पोलिसांनी आकाश चौरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात पाच ते सहा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोन विधी संघर्षित बालकांसह तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. संत कबीरनगरातील अरुण बंडीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी चिमण्या उर्फ महेश सोनवणे आणि सुमित बगाटे यांच्यासह अन्य साथीदारांनी कामटवाड्यात करणवर हल्ला केला. यामध्ये त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार करण्यात आले, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.