नवी दिल्ली : मला कळत नाही, सभागृह सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध ठिकाणी उद्घाटनाला जातात. पण लोकसभा आणि राज्यसभेत हे येत नाहीत. लोकशाही संपवायची यांची इच्छा आहे. १४१ लोकांचे निलंबन करून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. हे अत्यंत वाईट आहे. या विरोधात आम्ही लढणार आहोत. आज पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याशिवाय या देशात कोणीच नाही, असे समजत आहेत. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. याविरोधात आता २२ डिसेंबर रोजी आम्ही देशभर आंदोलन करणार आहोत, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावरून गृहमंत्र्यांनी सभागृहात निवेदन करावे, या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले असून, याच मुद्यावरून मोदी सरकारने थेट विरोधी पक्षांच्या खासदारांवरच कारवाईचा बडगा उगारत एकानंतर एक खासदार निलंबनाचा धडाका लावला आहे. याच मुद्यावरून कालपर्यंत ९२ खासदारांना निलंबित केले होते. आज लोकसभेतील तब्बल ४९ खासदार निलंबित केले. यामुळे दोन्ही सभागृहातील निलंबित करण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांची संख्या आता १४१ वर गेली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच निलंबित खासदारांनी संसदेसमोर आंदोलन करीत सरकारच्या कारवाईचा निषेध केला.