21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयविखापट्टनममध्ये ५१ देशांचे नौदल एकत्र येणार

विखापट्टनममध्ये ५१ देशांचे नौदल एकत्र येणार

विखापट्टनम : भारतीय नौदलाचे सामर्थ्य अवघ्या जगाला दिसणार आहे. विखापट्टणममध्ये होणा-या भारतीय नौदलाच्या युद्धाभ्यासात ५१ देशांचेही नौदल सहभागी होत आहेत. अशा प्रकारचा हा पहिलाच युद्धाभ्यास असेल, ज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात देशात एकत्र येतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात अनेक शत्रू राष्ट्रही एकत्र येतील. २७ फेब्रुवारीपर्यंत हा युद्धाभ्यास चालेल.

भारतीय नौदलाचे कवायत दर २ वर्षांनी आयोजित केले जाते. यंदाचे मिलन-२४ या आयोजनाचे बारावे वर्ष आहे. या आयोजनाचा विषय सुसंवाद, सौहार्द आणि सहकार्य असा आहे. विशेष म्हणजे भारतासह केवळ पाच देशांनी सुरू केलेल्या या नौदल सरावात यंदा ५१ देश सहभागी होत आहेत. त्यांच्या ३५ युद्धनौका भारतात पोहोचल्या आहेत. याशिवाय ५० हून अधिक विमानवाहू युद्धनौकाही आहेत. या कवायतीमध्ये प्रथमच भारताच्या दोन मोठ्या युद्धनौका आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य एकत्र येऊन आपली ताकद जगाला दाखवणार आहेत.

१९९५ मध्ये सुरू झालेली नौदलाची कवायत
भारताने १९९५ मध्ये नेव्ही ड्रिल मिलन सुरू केले, त्यावेळी इंडोनेशिया, सिंगापूर, श्रीलंका आणि थायलंडचे नौदल त्याचा भाग होते. सुरुवात अंदमार आणि निकोबार बेटांवरुन झाली होती. गेल्या ३० वर्षांत भारताचे सामर्थ्य आणि नौदलाचे सामर्थ्य इतके वाढले आहे की, आता जगातील अधिकाधिक देशांना या कवायतीचा भाग व्हायचे आहे. त्यामुळेच यावेळी ५१ हून अधिक देश या नौदलाच्या कवायतीचा भाग बनत आहेत. यापूर्वी २०२२ मध्ये नौदलाची सर्वात मोठी कवायत झाली होती, ज्यामध्ये भारतासह ३९ देश सहभागी झाले होते.

नौदलाच्या कवायतीत काय होणार?
मिलन-२४ हा एक संयुक्त नौदल सराव आहे, ज्याचा उद्देश नौदलांमधील व्यावसायिक संवाद वाढवणे आणि समुद्रात मोठ्या सैन्याच्या ऑपरेशनचा अनुभव मिळवणे आहे. याचे दोन टप्पे आहेत, पहिला टप्पा हार्बर आहे, तो १९ फेब्रुवारीपासून सुरू होईल, ज्यामध्ये सहभागी देशांचे नौदल सागरी समस्यांवर चर्चा करतात आणि समस्या सोडवण्यासाठी एका व्यासपीठावर आपली मते मांडतील. यानंतर २४ ते २७ फेब्रुवारीदरम्यान समुद्रात युद्धाभ्यास होईल.

शत्रू देश एकत्र
मिलन-२०२४ चे स्वरूप किती व्यापक आहे आणि ते किती खास आहे, याचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो की, यात अनेक शत्रू राष्ट्रही एकत्र येत आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख अमेरिका, इराण, येमेन, ओमान आहेत. या देशांमधील तणाव सर्वश्रुत आहे. याशिवाय रशिया आणि अमेरिका, फ्रान्स, गॅबॉन, रशिया आणि दक्षिण कोरिया इत्यादी देशांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्यावर तणाव आहे, परंतु ते सर्व भारताच्या या सरावात सहभागी आहेत.

हे देश भाग घेणार
२०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, ब्राझील, कंबोडिया, कॅनडा, कोमोरोस, जिबूती, युरोपियन युनियन, इजिप्त, इरिट्रिया, फिजी, फ्रान्स, गॅबॉन, जर्मनी, इंडोनेशिया, इराण, इराक, इटली, जपान, केनिया, मादागास्कर, मलेशिया, मालदीव, मॉरिशस , मोझांबिक, म्यानमार, नामिबिया, न्यूझीलंड, नायजेरिया, ओमान, पापुआ न्यू गिनी, पेरू, फिलीपिन्स, कतार, रशिया, सेशेल्स, सिंगापूर, सोमालिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, स्पेन, श्रीलंका, टांझानिया, थायलंड, तिमोर, यूएई, यूके, यूएसए, व्हिएतनाम, येमेनसह इतर देशही सहभागी होत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR