अमरावती : भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकी आली आहे. पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून जीवे मारण्याच्या धमकी त्यांना देण्यात आली आहे. याबद्दल नवनीत राणा यांनी मुंबईच्या खार पोलिसांना माहिती दिली आहे. नवनीत राणा यांना यापूर्वीही पाकिस्तानमधून धमकीचे मेसेज आले आहे.
नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या संदेशात म्हटले आहे की, हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढने वाली थोडे दिन की मेहमान है. जल्दी उडने वाली है.’ पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून या धमक्या नवनीत राणा यांना आल्या आहे. त्यानंतर राणा यांच्याकडून ही माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. नवनीत राणा यांना आलेली ही धमकी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना केंद्रीय यंत्रणेची मदत घ्यावी लागणार आहे.
मागील वर्षी आली होती धमकी
मागील वर्षी नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकी आली होती. त्यांच्या व्हॉटसऍप क्रमांकावर क्लिप पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ही धमकी आली आहे. आता पुन्हा राणा यांना धमकी आल्यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.