22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरराष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव यांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव यांचा राजीनामा

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सुपूर्त केला. जाधव यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंजूर केल्याची सूत्राची माहिती आहे, त्यामुळे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल नऊ वर्षांनंतर नवा अध्यक्ष मिळणार आहे. शरद पवार गटाचा नवीन अध्यक्ष कोण असणार, याची चर्चा आहे. मात्र, पक्षाचे माजी उपमहापौर पद्माकर ऊर्फ नाना काळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर शहराध्यक्षपदाची धुरा भारत जाधव यांच्याकडे जून 2015 मध्ये सोपवण्यात आली होती. त्यांची निवड ही तीन वर्षांसाठी होती. मात्र ते 2015 ते 2024 असे तब्बल नऊ वर्षे या पदावर होते. त्यांच्याविषयी पक्षातील अनेक पदाधिकारी नाराजी बोलून दाखवत होते. त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत संघर्षही उफाळला होता. मात्र, त्यानंतरही ते पदावर टिकून राहण्यात यशस्वी ठरले होते.

प्रकृतीच्या कारणामुळे आपण राजीनामा देत असून आता पक्षाला नवा माणूस मिळायला हवा, अशी माझी भावना आहे. पदावर नसलो तरी मी शरद पवार यांच्यासोबत कायम राहणार आहे. पवारांवर होणाऱ्या प्रत्येक टीकेला मी सडेतोड उत्तर देईन, असे भारत जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले. जाधव यांना पदावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये अनेकदा प्रयत्न झाले. मात्र, प्रत्येक वेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जाधव यांच्या पाठीशी राहिले. पक्षाला तरुण अध्यक्ष नेमावा, अशीही अनेक नेत्यांकडून मागणी करण्यात आली होती. मात्र, जाधव आपल्या पदावर कायम राहण्यात यशस्वी ठरले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शहराध्यक्षपद नव्या व्यक्तीकडे आणि तरुणाकडे द्यावे, यासाठी पक्षातील एक दुसरा गट प्रयत्नशील होता. त्यानंतर जाधव यांनी पुण्यात जाऊन पवारांची भेट घेत शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. भारत जाधव यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सोलापूर शहराध्यपदी कोणाची वर्णी लागणार?, याची उत्सुकता सोलापूरच्या राजकीय वर्तुळाला आहे. माजी उपमहापौर पद्माकर उर्फ नाना काळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे, त्यासाठी महेश कोठे यांचा गटही प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मात्र, ऐनवेळी नवा आणि धक्कादायक नावही पुढे येऊ शकते.

सोलापूर शहराचे अध्यक्ष भारत जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्षही बदलणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या फिरण्यावर मर्यादा येतात, त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदावरून आपल्याला मुक्त करावे, अशी विनंती पवार यांच्याकडे केली होती. मात्र, खुद्द शरद पवार यांनीच साठे यांना पदावर राहण्यास सांगितले होते. मात्र, राष्ट्रवादीतील फुटीनंतरचे आव्हान आणि आगामी निवडणुका लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात फिरून पक्ष बांधणी करणारा तरुण नेता जिल्हाध्यक्ष पदावर असावा, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदाबरोबरच जिल्हाध्यक्षही बदलणार का, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR