22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रनवाब मलिक प्रकरणात राष्ट्रवादीची सावध भूमिका

नवाब मलिक प्रकरणात राष्ट्रवादीची सावध भूमिका

नागपूर : (प्रतीनिधी)
देशद्रोह्याशी संबंधाचे आरोप असलेल्या नवाब मलिक यांनी महायुतीत घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघड विरोध केल्यानंतर अजित पवार गटाने त्याचा प्रतिवाद न करता सावध भूमिका घेतली आहे. नवाब मलिक नेमके कोणत्या गटात आहेत हे स्पष्ट झाल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले. याबाबत आधिक बोलण्यास नकार देताना त्यांनी पत्रकारांवर संताप व्यक्त केला.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सध्या अजित दादा गटासोबत असलेले नवाब मलिक काल विधानसभेत सत्ताधारी बाजूच्या बाकावर बसले होते. त्यामुळे टीकेचे सुर उमटल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून देशद्रोह्याशी संबंध असलेल्या व्यक्तीला महायुतीत घेण्यास आमचा विरोध असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे सत्ताधारी पक्षांमधील मतभेद समोर आले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अजित पवार आज सकाळी विधानभवनात येताच पत्रकारांनी त्यांना गाठले व त्यांना ही भूमिका मान्य आहे का ? असा सवाल केला.

तेव्हा काहीशा उद्वेगाने अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेले पत्र मला मिळाले आहे. ते मी वाचले आहे. नवाब मलिक हे काल पहिल्यांदाच सभागृहात आले होते. अद्याप त्यांनी त्यांचे मत व्यक्त केलेले नाही. नवाब मलिक यांची भूमिका काय आहे. ते कोणत्या गटासोबत आहेत. हे कळाल्यानंतर मलिकांसंबंधी माझी भूमिका स्पष्ट करेन असे त्यांनी सांगितले. सभागृहात कोणी कुठे बसावे हा माझा अधिकार नाही, तो अध्यक्षांचा अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रफुल्ल पटेल यांनी घेतली फडणवीसांची भेट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रामुळे निर्माण झालेल्या पेचाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज विधानभवनात येऊन त्यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पाठवलेला पत्राचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. नवाब मलिक आमच्याकडे आहेत, की दुसरीकडे आहेत, हे स्पष्ट नाहीय. पुढे काही होईल तेव्हा उत्तर देऊ असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. नवाब मलिक आमचे जुने सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडी झाल्या त्यावेळी नवाब मलिक कोणाबरोबरही नव्हते. मेडिकल ग्राउंडवर त्यांना जामीन मिळाल्यानंतर आम्ही सगळेच त्यांना भेटायला गेलो होतो. बाकीचे लोकही गेले. सहका-यांच्या तब्येतीबाबत माहिती घेणं हे आमचं कर्तव्य होतं. नवाब मलिक आमदार आहेत आणि विधानसभेत आल्यानंतर जुने सहकारी त्यांना भेटले असतील तर ते स्वभाविक आहे. आम्ही कुणीही नवाब मलिकांची भुमिका काय? त्यांची उद्याची वाटचाल काय? याबद्दल चर्चा केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR