24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयराज्यसभेत एनडीए बहुमताच्या जवळ

राज्यसभेत एनडीए बहुमताच्या जवळ

संख्याबळ पोहोचले आता ११७ वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यसभेच्या ५६ जागासांठी द्वीवार्षिक निवडणूक पार पडली आहे. राज्यसभेच्या ५६ जागांपैकी ४१ जागा बिनविरोध झाल्या होत्या तर उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील १५ जागांसाठी निवडणूक पार पडली. यात उत्तर प्रदेशात भाजपने ८ जागांवर तर समाजवादी पक्षाचे २ उमेदवार विजयी झाले. कर्नाटकात काँग्रेसने ३ आणि भाजपने एक जागा मिळवली. हिमाचल प्रदेशमधील जागा काँग्रेस आमदारांच्या क्रॉस वोटिंगमुळे भाजपकडे गेली. राज्यसभेच्या ५६ जागांची निवडणूक पार पडल्याने एनडीएचे संख्याबळ ११७ झाले आहे. सध्या राज्यसभेतील बहुमताचा आकडा १२१ इतका आहे.

राज्यसभेच्या ५६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या संख्येत वाढ झाली. भाजपचे २८ खासदार निवृत्त झाले होते. भाजपने उत्तर प्रदेशात एक आणि हिमाचल प्रदेशात एक अधिकचा खासदार निवडून आणला. यामुळे त्यांची संख्या ३० वर पोहोचली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे ९ खासदार निवडून आले आहेत. तृणमूल काँग्रेस ४, आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस पार्टीचे ३, समाजवादी पार्टीचे २, राजदचे २, बिजू जनता दल २, शिवसेना १, जदयू १, भारत राष्ट्र समिती १, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे १ उमेदवार विजयी झाले.

भाजप शतकापासून
तीन पावले दूर
राज्यसभेच्या सध्याच्या संख्याबळानुसार २४० ही सदस्यसंख्या आहे. भारतीय संविधानानुसार राज्यसभेची सदस्य संख्या २३८ आणि १२ राष्ट्रपती नियुक्त खासदार अशी एकूण २५० आहे. मात्र, सध्याची सदस्य संख्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून २३३ आणि राष्ट्रपती नियुक्त १२ सदस्य अशी एकूण २४५ आहे. त्यापैकी जम्मू काश्मीरच्या चार जागा रिक्त आहेत. राष्ट्रपती नियुक्त खासदाराची एक जागा रिक्त आहे. त्यामुळे २४० ही सदस्यसंख्या निश्चित केल्यास बहुमताची आकडेवारी १२१ होते तर एनडीएची सदस्य संख्या ११७ पर्यंत पोहोचली आहे. यात एकट्या भाजपचे ९७ खासदार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR