सोलापूर : होटगी रोड, विजयपूर रोड, जुळे सोलापूर भागातील सुमारे दोन लाख नागरिकांसाठी असलेले नेहरू नगर येथील शासकीय मैदान हे एकमेव आहे. या मैदानावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. हे मैदान जनावरांसाठी कुरण बनले आहे. वाढलेल्या गवतामुळे मैदानावर सापांचा वावरही वाढला आहे.
शासकीय मैदानावर रोज सकाळी आणि सायंकाळी हजारो नागरिक व्यायामासाठी येतात, खेळाडूही वाचा लाभ घेतात, वर्षभरात अनेक वेळा क्रिकेटच्या स्पर्धाही भरविल्या जातात. शिवाय शालेय स्पर्धा आयोजित करण्यासाठी मैदानाची थोडी दुरुस्ती करण्यात येते. नंतर या मैदानाकडे क्रीडा कार्यालय पुढील वर्षीच लक्ष देते. येथे बॉलीबॉल, जॉंिगग ट्रॅक, रनिंग ट्रॅक, -कबड्डी, चास्केटबॉल, खो-खो खेळ खेळले जातात.
पावसामुळे गवत वाढल्याने चरण्यासाठी जनावरे मोठ्या प्रमाणात मैदानात येत आहेत. मैदानावर येणा-या लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गवतही मोठ्या प्रमाणात वाढल्याने गवतातील सरपटणारे प्राणीही अधूनमधून लोकांच्या निदर्शनास पडतात, त्यामुळे वाढलेले गवत लोकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. पहाटे पाच वाजल्यापासून नागरिक नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर व्यायाम करण्यासाठी येतात.
पहाटेच्या वेळेस मैदानाच्या बाजूने असलेल्या रनिंग ट्रॅकवरून धावत असतात तेव्हा वाळलेल्या गवतामुळे त्या ट्रॅकवर सरपटणारे प्राणी आल्याचे लगेच दृष्टीस पडत नाहीत. त्यामुळे चुकून सरपटणा-या प्राण्यांवर धावणा-यांचा पाय पडण्याची शक्यता असल्याने अपघात होऊ शकतो. जुळे सोलापुरातील बहुतांश नागरिक व्यायामासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी मैदानावर येतात. मैदानावर गवत वाढते आहे. जनावरांचाही वावर असतो. त्यामुळे वाढलेले गवत कमी करण्याचरोबरच जनावरे आत येऊ नयेत यासाठी प्रयत्न आवश्यक आहे.