21.3 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमुख्य बातम्या‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ अंतर्गत राज्यात ड्रोन केंद्रांचे जाळे

‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ अंतर्गत राज्यात ड्रोन केंद्रांचे जाळे

६ विभागीय, १२ जिल्हास्तरीय केंद्रांची निर्मिती प्रस्तावित

पुणे : राज्य सरकारने ‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ राबवण्यास मंजुरी दिली आहे. त्या अंतर्गत राज्यात ड्रोन केंद्रांचे जाळे निर्माण करण्यात येणार असून, ६ विभागीय आणि १२ जिल्हास्तरीय ड्रोन केंद्र निर्माण केली जाणार आहेत. या ड्रोन केंद्राचे मुख्यालय आयआयटी मुंबईमध्ये उभारले जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला.

ड्रोन तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. तसेच प्रशासकीय क्षेत्रातही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते. या अनुषंगाने महाराष्ट्राला ड्रोन हब म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने आयआयटी मुंबईने महाराष्ट्र ड्रोन मिशन हा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाला सादर केला.

या अहवालात ड्रोन अभियानाची उद्दिष्टे, ड्रोन तंत्रज्ञानाच्या उपयोगाच्या संभाव्य शक्यता, आव्हाने, ड्रोन वापरासंदर्भातील प्रचलित नियम आणि कायदे आदींचा समावेश आहे. त्या अनुषंगाने राज्यातील अभियांत्रिकी शैक्षणिक आणि संशोधन संस्था, शासकीय यंत्रणा, औद्योगिक आस्थापना यांच्या सहभागातून ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. विविध प्रशासकीय विभागांकडून त्यांच्या समस्येनुसार आणि प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर पाच वर्षांत हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचे नियोजन आहे.

राज्यात कृषी, आपत्ती निवारण, सर्वेक्षण, पुरवठा आणि वितरण अशा विविध क्षेत्रांत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र ड्रोन अभियान या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारकडून २३८ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी, त्यात बदल या अनुषंगाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR