धाराशिव : प्रतिनिधी
वाशी तालुक्यातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर चालकाला मारहाण करून वाहनातील साहित्य लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना इंदापूर ता. वाशी येथील नरसिंह साखर कारखान्यासमोर ४ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. चोरट्यांनी कंटेनर चालकाला मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम २७ हजार रूपये व कंटेनर मधील ७ नवीन दुचाकी लंपास केल्या. या प्रकरणी वाशी पोलीस ठाणे येथे चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून ५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेश राज्यातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील कंटेनर चालक नयाससोद्दीन शाहिद खान हे कर्नाटक राज्यातून कंटेनर घेऊन जयपूर (राजस्थान) येथे जात होते. कंटेनरमध्ये टि.व्ही. एस कंपनीच्या आपाची मोडेलच्या ४० नवीन दुचाकी होत्या. त्यांचा कंटेनर इंदापूर येथील साखर कारखान्यासमोर आल्यानंतर ते बाथरूमसाठी खाली उतरले होते. त्यावेळी चोरट्यांनी चालक खान हे गाडीत बसले असता अनोळखी पाच चोरट्यांनी त्यांना लाथाबुक्यांनी व काठ्यांनी मारहाण केली. व गळ्याला चाकु लावून नयाससोद्दीन खान यांचे खिशातील रोख रक्कम २७ हजार रूपये लुटले.
चोरट्यांनी कंटेनर मधील टि.व्ही.एस कंपनीच्या आपाची मोडेलच्या ७ दुचाकी जबरदस्तीने लंपास केल्या. या प्रकरणी नयाससोद्दीन खान यांनी दि.५ नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पोलीस ठाणे येथे कलम ३९५, ३९७ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.