मुंबई : प्रतिनिधी
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजूनही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी उशिरापर्यंत तयार नव्हते. शिंदे आणि शिवसेनेचे आमदार गृहखात्याची मागणी करत आहेत. गृहखात्यावर दावा केला जात आहे. पण भाजप गृहखाते सोडण्यास तयार नाही, त्यात आता राष्ट्रवादीने छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवरून नवा वाद ओढवला आहे.
दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही याबाबत संभ्रम होता. देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचून शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे आणि फडणवीस यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सकारात्मक झाले. मात्र राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेवरून नवा वाद सुरू झाला आहे. उदय सामंत यांनी राष्ट्रवादीने छापलेल्या निमंत्रण पत्रात शिंदे यांचे नाव नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेने राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेवर आक्षेप घेतला आहे. बुधवारी देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर यानंतर लगेचच शपथविधीच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो व्हायरल झाला. सरकार स्थापनेचा दावा करण्याआधी ही निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. निमंत्रण पत्रिकेत फक्त फडणवीस यांचे नाव आहे. यानंतर महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे नाव आहे. राष्ट्रवादीकडून हे निमंत्रणपत्र छापण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची फक्त नावे आहेत. पण एकनाथ शिंदे यांचे नाव नाही. शिंदे यांना कोणत्याही किमतीत गृहमंत्रालय हवे आहे. निमंत्रणपत्र हे केवळ निमित्त असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.