मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पवार कुटुंबातील नव्या पिढीचे नेते रोहित पवार यांच्यातील सुप्त संघर्ष लपून राहिलेला नाही. पण आता तो अधिक उघडपणे बाहेर येत असून पक्षाकडून जबाबदरीचं पद मिळत नसल्यामुळे रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. स्वत: रोहित पवार यांनीही, मी कुठेतरी कमी पडत असेल म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवत नसतील, असे सांगताना आपली नाराजी प्रकट केली. त्यातच अजित पवार गटाचे सुनील शेळके यांनी रोहित पवार कधीही मंत्री होऊ शकतात असे सूचक वक्तव्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवणा-या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीत मात्र सहाव्या क्रमांकावर गेली आहे. तेव्हापासून राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करण्याचीही मागणी होत आहे. परंतु त्यांना कायम ठेवताना शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांच्यावर पक्षाने विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे विधानसभेचे गटनेते पद, तर दिवंगत आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्याकडे पक्षाचे प्रमुख प्रतोदपद देण्यात आले आहे.
आपल्यावर कोणतीही मोठी जबाबदारी दिली जात नसल्याने रोहित पवार नाराज असल्याची चर्चा होती. स्वत: रोहित पवार यांनीही आज विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना, आपली नाराजी प्रकट केली. सात वर्षांपासून मी पक्षात सक्रिय आहे. मी कुठेतरी कमी पडत असेल असे काही नेत्यांना वाटत असेल, असे सांगत रोहित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
पक्षाने जबाबदारी दिली नाही म्हणून मी नाराज आहे असा विषय नाही. माझे एवढंच म्हणणे आहे की, विरोधी पक्षात अनेक दिग्गज आणि अनुभवी नेते आहेत. पण आज सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने फार कमी नेते बोलताना दिसतात. आज लढण्याचे दिवस आहेत, शांत बसण्याचे नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज नाराज आहे. त्यात मी सुद्धा नाराज आहेहे, असं बोलायला हरकत नाही. राहिला प्रश्न जबाबदारीचा तर कदाचित सात वर्षात कुठेतरी मी कमी पडत आहे असं काही नेत्यांना वाटत असेल. त्यामुळे त्यांनी त्याबाबत निर्णय घेतला असेल. नाहीतर काही महत्त्वाचे निर्णय उद्या घ्यायची गरज असेल, त्यावेळेस तो निर्णय होईल. पण नेमकी काय चर्चा झाली हे मला सांगता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
रोहित पवार कधीही मंत्री होऊ शकतात : शेळके
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार शेळके यांनी रोहित पवार कधीही मंत्री होऊ शकतात असल्याचे सांगून, नवे पिल्लू सोडले आहे. रोहित पवार यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते. पण त्यांना ते पद न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. त्यांनी हे उघडपणे व्यक्त केलं आहे. त्यांना सत्तेचा मोह आवरत नाही. त्यांना सत्तेत आल्याशिवाय पर्याय नाही. ते सत्तेत कधीही सामील होऊ शकतात, असा दावा सुनील शेळके यांनी केला.