बालासोर : ओदिशामधील बालासोर येथे झालेल्या एका रेल्वे अपघाताची माहिती समोर आली असून बालासोर येथे न्यू जलपैगुडी एक्स्प्रेस रुळावरून घसरली. बालासोर जिल्ह्यातील सबीरा पोलिस ठाण्याजवळ ही ट्रेन रुळांवरून उतरल्याचे सांगण्यात येत आहे. रुळावरून उरल्यावर ही ट्रेन एका विजेच्या खांबावर आदळली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेले नाहीत.
दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिका-यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या अपघातप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ही ट्रेन नेमकी कशी काय रुळांवरून उतरली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. हा अपघात नेमका कसा घडला, याची माहिती तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल.
दरम्यान, न्यू जलपैगुडी एक्स्प्रेस रुळांवरून उतरल्यानंतर ट्रेनमधील प्रवासी बाहेर आले. त्यामुळे अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे काही अधिकारी आणि पोलिस अपघातस्थळी पोहोचले. त्यानंतर घसरलेल्या ट्रेनला रुळावर आणून वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले.