दुबई : न्यूझीलंडने प्रथमच महिला टी २० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा ३२ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ५ गडी गमावून १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १२६ धावा करता आल्या.
न्यूझीलंडकडून अमेलिया केरने ४३, ब्रुक हॅलिडेने ३८ आणि सुझी बेट्सने ३२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको मलाबाने सर्वाधिक २ बळी घेतले. क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लर्क आणि अयाबोंगा खाका यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. किवी संघ तब्बल १४ वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचला होता. याआधी हा संघ २००९ आणि २०१० या दोन्ही विश्वचषकांच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, पण दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिका सलग दुस-यांदा फायनल खेळणार आहे, २०२३ मध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
न्यूझीलंडने महिला टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. किवी संघ पहिल्यांदाच हा ट्रॉफी ंिजकण्यात यशस्वी ठरला आहे. क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे हे पहिले विश्वचषक विजेतेपद आहे. देशाच्या पुरुष संघाला अद्याप विश्वचषक जिंकता आलेला नाही. नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजी निवडली. न्यूझीलंडने १५८ धावा केल्या.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने सातत्याने विकेट गमावल्या आणि अखेरीस संघ केवळ १२६ धावा करू शकला. दक्षिण आफ्रिकेला महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दुस-यांदा पराभव पत्करावा लागला आहे. या वर्षी जूनमध्ये झालेल्या पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला होता.