मुंबई : विधान परिषद पोटनिवडणुकीच्या ५ जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी ६ उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र अपक्ष उमेदवाराकडे आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणि नोटरी नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. तसेच विरोधकांकडून कोणताही अर्ज आला नसल्यामुळे महायुतीचे ५ उमेदवार निवडणूक न होताच विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले. यानंतर आज या पाचही नवनिर्वाचित आमदारांनी विधान परिषदेत शपथ घेतली.
गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमश्या पाडवी (अक्कलकुवा), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर (पाथरी) तर भाजपचे प्रवीण दटके (नागपूर मध्य), गोपीचंद पडळकर (जत) आणि रमेश कराड (लातूर ग्रामीण) हे निवडून आल्याने विधानपरिषदेतील या पाच जागा रिक्त झाल्या होत्या. या रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घोषित केली आहे. प्रत्येक पोटनिवडणूक स्वतंत्र होणार असल्याने आणि सत्ताधारी महायुतीचे विधानसभेतील प्रचंड संख्याबळ पाहता या पोटनिवडणुकीत विरोधी महाविकास आघाडीला संधी नव्हती.
विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी २७ मार्च रोजी निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे, शिवसेना शिंदे गटाकडून चंद्रकांत रघुवंशी, तर अजित पवार गटाकडून संजय खोडके यांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. सहाव्या उमेदवाराने अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. मात्र, अपक्षाच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून आमदारांच्या सह्या नसल्याने हा अर्ज छाननीत बाद झाला. त्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले. यानंतर पोटनिवणूक न घेता आज संदीप जोशी (नागपूर), संजय केनेकर (छत्रपती संभाजीनगर), दादाराव केचे (वर्धा), चंद्रकांत रघुवंशी (नंदुरबार) आणि संजय खोडके (अमरावती) यांना विधान परिषद सभागृहात शपथ देण्यात आली.
खोडके दाम्पत्याची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संजय खोडके यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने विधिमंडळात प्रथमच पती-पत्नी एकत्र दिसणार आहेत. संजय खोडके यांच्या अर्धांगिनी सुलभा खोडके या पंधराव्या विधानसभेत अमरावती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे पती-पत्नी एकाचवेळी विधिमंडळाचे सदस्य असण्याचा योग जुळून आला आहे. यापूर्वी विधिमंडळात वडील-मुलगा, भाऊ-भाऊ अशा जोड्या कार्यरत राहिल्या आहेत.