बंगळुरू : दहशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा बुधवारी बंगळुरूमधील सहाहून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. एनआयएच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने शोध मोहीम सुरू केली आहे. सोमवारी रात्री काही अज्ञात लोकांकडून बंगळुरूमधील राजभवन उडवून देण्याची धमकी दिली होती. मात्र, पोलिसांनी तपासाअंती ही अफवा असल्याचे म्हटले आहे.
दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय असल्याच्या संशयितांच्या ठिकाणी शोधमोहीम सुरूच आहे. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या १५ दहशतवाद्यांना ९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विविध भागातून अटक केल्यानंतर शोध सुरू करण्यात आला होता. एनआयएच्या पथकाने महाराष्ट्रातील पुणे, मीरा रोड, ठाणे आणि कर्नाटकातील बंगळुरूसह अन्य ४४ ठिकाणी छापे टाकले आहेत.
छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड, धारदार शस्त्रे, अनेक कागदपत्रे, स्मार्टफोन आणि इतर अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. ईसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूलचे सर्व सदस्य महाराष्ट्रातूनच काम करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. द्वेष आणि अशांततेचा मार्ग निवडून हे दहशतवादी देशातील शांतता भंग करण्याचा आणि केंद्र सरकारविरुद्ध युद्ध सुरू करण्याचा प्रयत्न करत होते. एनआयएने यावर्षी ईसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूलवर गुन्हा दाखल केला आहे.