अबुजा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एक मोठी उपलब्धी नोंदवण्यात आली आहे. आफ्रिकन देश नायजेरियाच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना नायजेरियाने द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर या पुरस्काराने सन्मानित केले आहे. यापूर्वी हा सन्मान फक्त राणी एलिझाबेथ यांना मिळाला होता. म्हणजेच, हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे परदेशी नेते आहेत.
हा पंतप्रधान मोदींचा १७ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
पंतप्रधान मोदी नायजेरियात पोहोचताच अध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांनी अबुजा विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत केले. फेडरल कॅपिटल टेरिटरी मंत्री न्येसोम इझेनवो विके यांनी अबुजा शहराच्या चाव्या पंतप्रधान मोदींच्या हातात दिल्या आणि त्यानंतर मोदींचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
मोदींनी मानले आभार
या सन्मानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे राष्ट्रपती टिनुबू यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, धन्यवाद राष्ट्रपती टिनुबू. तुमच्या या स्वागताबद्दल मी आभारी आहे. या भेटीमुळे आपल्या देशांमधील द्विपक्षीय मैत्री अधिक घट्ट होईल. नायजेरियातील भारतीय समुदायाकडून एवढ्या उत्साहाने स्वागत होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे असे मोदी म्हणाले.
पीएम मोदी तीन देशांच्या दौ-यावर
१६ ते २१ नोव्हेंबर दरम्यान तीन देशांच्या दौ-यावर निघालेले पंतप्रधान मोदी १६ रोजी नायजेरियाला पोहोचले. नायजेरियानंतर पंतप्रधान मोदी जी-२० नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलला जाणार आहेत.