पुणे : प्रतिनिधी
माजी खासदार निलेश राणे यांच्या पुण्यातील शिवाजीनगर भागातील हॉटेलला मिळकत कर थकवल्याने पुणे महापालिकेने टाळे ठोकले होते. यानंतर बुधवारी निलेश राणे यांच्याकडून २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. याबाबत सुनावणी होऊन पुढील रक्कम भरण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले, अशी माहिती महापालिकेचे मिळकत कर प्रमुख माधव जगताप यांनी दिली आहे. मात्र निलेश राणे यांनी २५ लाखांचा धनादेश देताच ३ कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची थकबाकी शून्यावर आली आहे.
निलेश राणे यांनी बुधवारी २५ लाखांचा धनादेश पुणे महानगरपालिकेकडे जमा केला आहे. यानंतर त्यांची थकबाकी शून्य करण्यात आली आहे. राजकीय दबावापोटी त्यांची थकबाकी शून्य करण्यात आल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.
तीन वर्षांपासून होती थकबाकी
निलेश राणे यांचे पुण्यातील डेक्कन परिसरात आर-डेक्कन मॉलमधील तिस-या मजल्यावर हॉटेल आहे. या हॉटेलची ३ कोटी ७७ लाख ५३ हजार ८०३ रुपये एवढी रक्कम मागील तीन वर्षांपासून थकलेली होती. महापालिकेच्या माध्यमातून वारंवार नोटीस देऊन ही रक्कम न भरल्याने ती मिळकत सील करण्यात आली होती.