पुणे : निलेश राणेंच्या मालमत्तेवर पालिकेने कारवाई केली. डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यावसायिक जागेचा कर न भरल्याने पुणे महानगरपालिकेने त्या हॉटेलला सील ठोकले आहे. मालमत्ता थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. तब्बल ३ कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची थकबाकी होती.
पुण्यात अनेकांनी मालमत्ता कर थकवला आहे. सध्या महापालिकेकडून कर वसुली केली जात आहे. या कठोर कारवाईमुळे राजकीय वर्तुळातील व्यक्तींनाही झटका बसल्याचे उघड झाले. महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून थकबाकी वसुलीवर जोर देण्यात आला आहे. पाच पथकांद्वारे पुणे शहराच्या विविध भागात थकबाकी न भरणा-या व्यावसायिक मिळकती सील केल्या जात आहेत. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बँड वाजवून थकबाकी वसूल करण्यावर भर दिला जात आहे.
शिवाजीनगर विभागाच्या हद्दीत डेक्कन कॉर्नर येथे राणेंच्या मालकीचा मॉल आहे. या मॉलची एकूण ५ कोटी ६० लाख रुपये थकबाकी होती, त्यापैकी १ कोटी ४० लाख रुपये एका मजल्याची थकबाकी संबंधितांनी भरली. त्यानंतर वरच्या दोन मजल्यांची ३ कोटी ७७ लाख थकबाकी भरावी यासाठी प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. पण संबंधितांकडून त्यास दाद दिली नव्हती. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने ही मिळकत सील केली.