पाटणा : वृत्तसंस्था
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची दाट चिन्हे आहेत. राजकीय जाणकार याला मोठ्या वादळाची चिन्हे मानत आहेत. लालू यादव आणि तेजस्वी यादव यांची नितीशकुमार यांच्याशी झालेली भेट निष्फळ ठरली आहे. नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. यासाठी अटी निश्चित केल्या आहेत. फक्त योग्य क्षणाची वाट पाहिली जात आहे, असेही सांगितले जात आहे.
नितीशकुमार यांनी एनडीएसोबत जाण्यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. जेडीयूची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते नवी कार्यकारिणी तयार झाली आहे. विशेष म्हणजे राजीव रंजन उर्फ लालन सिंह यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांची गठित कार्यकारिणी बरखास्त करून नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. वशिष्ठ नारायण सिंह यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नव्या समितीत २२ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता नितीशकुमार यांचीच समिती कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास तयार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय गोटात चर्चा रंगली आहे.
राजकीय चर्चेला वेग
जेडीयूने एनडीएचा भाग बनण्याचा निर्णय घेतल्याचे राजकीय चर्चेत ठामपणे बोलले जात आहे. जेडीयूने दोन अटी ठेवल्या होत्या. जेडीयूला एनडीएमध्ये समाविष्ट करण्यासाठी भाजपने ज्या अटी ठेवल्या आहेत, त्यात पहिली अट म्हणजे नितीशकुमार यांनी विधानसभा विसर्जित करावी. लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. दुसरी अट म्हणजे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजप जेडीयूला पूर्वीप्रमाणेच समान जागा देईल. ज्यांच्या जास्त जागा, त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल, असे भाजपचे म्हणणे असल्याचे बोलले जात आहे.