नवी दिल्ली : ‘इंडिया’ आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत मिळालेल्या वागणुकीमुळे नाराज असल्याचा दावा करण्यात आलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नितीश यांना आघाडीचे संयोजकपद किंवा समकक्ष पद देण्याबद्दल काँग्रेसकडून घटक पक्षातील इतर नेत्यांशी चर्चा करून चाचपणी सुरू केल्याचे समजते.
गेल्या १९ डिसेंबरला दिल्लीत झालेल्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे करावे, असा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनुमोदन दिले होते. अचानकपणे झालेल्या घडामोडीमुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार नाराज झाले होते. ते त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेलासुद्धा हजर राहिले नव्हते.
यानंतर नितीशकुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून या घटनाक्रमाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुळात नितीशकुमार यांनी ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनीच ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन त्यांनी ‘इंडिया’ आघाडीत आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांची नाराजी परवडणारी नसल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी तत्काळ पावले उचलून नितीशकुमार यांना ‘इंडिया’ आघाडीत संयोजककिंवा समकक्ष पद देण्याच्या संदर्भात इतर नेत्यांशी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसची गुरुवारी बैठक
विविध राज्यांतील घटकपक्षांशी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप व आगामी भारत न्याय यात्रेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचे सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष व सरचिटणीस यांची बैठक येत्या चार जानेवारीला बोलाविली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्यासंदर्भात सर्व राज्यांच्या नेत्यांशी काँग्रेस श्रेष्ठींची चर्चा झालेली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय आघाडी समितीनेसुद्धा सर्व राज्यांच्या नेत्यांशी चर्चा करून जागावाटपावर काय भूमिका घ्यावी, याची चर्चा झालेली आहे.
बिहारच्या नेत्यांचा दबाव
बिहारमधील काँग्रेसच्या नेत्यांनीसुद्धा नितीशकुमार यांना नाराज करणे परवडणारे नसून त्यांना ‘इंडिया’ आघाडीत पुरेसा सन्मान देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. बिहारच्या नेत्यांनी नुकतीच काँग्रेस श्रेष्ठींची दिल्लीत भेट घेऊन बिहारमध्ये नितीशकुमार यांची प्रतिमा चांगली असल्याने त्यांना नाराज करता येणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. यामुळेही काँग्रेस श्रेष्ठींनी तातडीने पावले उचलल्याचे सांगितले जात आहे.