चाकूर : चाकूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष कपील गोविंदराव माकणे यांच्याविरुद्ध आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडे सर्व १४ नगरसेवकांनी अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला आहे.
चाकूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष कपील गोविंदराव माकणे हे आम्हाला विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असून ते नियमबाहय कामकाज चालवतात. विशेष म्हणजे ते लातूरला राहत असल्याने ते या पदासाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे ते नगरपंचायतीचे कामकाज भ्रष्टाचायुक्त चालवितात. यामुळे तातडीने कारवाई करून नगराध्यक्ष माकणे यांना काढून टाकण्याची मागणी चाकूर नगरपंचायत सदस्यांनी केली आहे.
या मागणीवर अ. करीम गुळवे, मिलिंद महालिंगे, भागवत फुले, साईप्रसाद हिप्पाळे, अभिमन्यू धोंडगे, सय्यद मुज्जमील, सुजाता रेडडी, ज्योती स्वामी, शुभांगी कसबे, गंगुबाई गोलावार, गोदावरी पाटील, सय्यद शबाना, सय्यद शाहिनबानू, वैशाली कांबळे आदि सदस्यांच्या सह्या आहेत.