मुंबई : राज्यातील शेतक-यांनी पुढील दोन वर्षे तरी कर्जमाफी मिळणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले. सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे या वर्षी पण आणि पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा, असे आवाहन अजित पवार यांनी केले होते. यानंतर लाडकी बहिण योजनेमुळे राज्यावर ४३ हजार कोटींचा भार येत असल्याने शेतकरी कर्जमाफी होऊ शकत नसल्याची स्पष्टोक्ती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीनंतर शेतक-यांची कर्जमाफी होणार असल्याची चर्चा राज्यात सुरु आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारच्या वतीने तशी कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात तरी शेतक-यांना तसा दिलासा मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अर्थसंकल्पात देखील शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख करण्यात आला नाही. अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे, त्या अनुषंगाने कदाचित अजित पवार यांनी शेतक-यांची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केली आहे.
लाडकी बहीण योजना आम्ही जेव्हा जाहीर केली त्यावेळी त्याचा असलेला आर्थिक भार जवळपास ४३ हजार कोटींचा आहे. त्यामुळे विकासाची कामे असली तरी त्याची गती मंदावली आहे. म्हणून पुढच्या काळात महसूल कसा वाढेल याकडे सरकारचे लक्ष आहे. महसूल वाढला तर या कामांना गती देता येईल. लाडकी बहीण योजना ही कायम चालू ठेवायला मदत देखील करता येईल असे संजय शिरसाट म्हणाले.
कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक
अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल विरोधकांकडून टीका केली जात आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रहार संघटना ११ एप्रिल रोजी राज्यभरात आमदारांच्या घरांसमोर टेम्भे पेटवून आंदोलन करणार आहे. सरकारने आंदोलनाची दखल घेऊन निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अन्यथा टेम्भेच्या मशालीने आम्हाला पेटवून द्या, असा निर्वाणीचा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.
सरकारला आश्वासनाचा विसर
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीआधी १०० दिवसाच्या आत शेतक-यांचा सातबारा कोरा करणार असल्याची आश्वासन दिले होते. शिवाय भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये सदर शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख होता. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन करून स्वत:चे व सरकारचे अपयश दाखवून दिले, अशी टीका स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आली.