मुंबई : महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी आणि इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी तयार झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेत अद्याप कुठलीही आघाडी नाही. मराठी माणूस आणि मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत. त्यामुळे युतीबाबत हे दोन्ही बंधू निर्णय घेण्यास सक्षम आहेत असे मोठे विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती हा इंडिया आघाडीचा विषय नाही. हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर राष्ट्रीय स्तरावर कधी चर्चा होत नाही. काही जण दिल्लीत पक्षप्रमुखांशी चर्चा करत असतील. परंतु ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घेतलेला आहे. ही महाराष्ट्राची मोठी घडामोड आहे.
प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे यावर चर्चा होत असते. दोन बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत कुणालाही आक्षेप नाही. मराठीच्या प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळ यांनीही भूमिका मांडली आहे. आम्ही राजकीय दृष्ट्या एकत्र आलो त्याचा केंद्रबिंदू मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान आणि महाराष्ट्राचे रक्षण हाच आहे. शरद पवार असतील, राज्यातील काँग्रेसचे प्रमुख असतील या सर्वांची भूमिका मराठीबाबत समान आहे. आम्ही सगळे त्यासाठी एकत्र आलो होतो असे त्यांनी सांगितले.
तसेच आमची सगळ्यांशी चर्चा करतो, महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी निर्माण झाली. इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी तयार झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अद्याप कुठली आघाडी निर्माण झाली नाही. प्रत्येक महापालिका, जिल्हा परिषद क्षेत्रात स्थानिक आघाडी निर्माण होते हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यात ब-याचदा राजकीय पक्षही नसतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार त्या त्या शहरातील, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका-यांना असतात. मुंबई हा विषय वेगळा असल्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतंत्र भूमिका घेण्यास समर्थ आहेत असे संजय राऊतांनी स्पष्ट केले.