मुंबई : माझ्याविरुद्ध कितीही चक्रव्यूह रचले तरीही मी अभिमन्यू होणार नाही. मी आधुनिक अभिमन्यू चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे हे मला माहिती आहे असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांच्या बातमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी काही माध्यमात बातमी पाहिली, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी फक्त देवेंद्र फडणवीसांना हल्ला करा. ही आनंदाची गोष्ट आहे. यातून तुमचे राजकारणातील स्थान किती बळकट आहे याचा अंदाज येतो. सगळ्यांना मिळून एकाच व्यक्तीवर हल्ला करावा वाटते, उद्धवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस तेच करते. हे माझ्याविरुद्ध चक्रव्यूह तयार करतायेत. तुम्ही चक्रव्यूह तयार करून मला अभिमन्यू करायचा प्रयत्न करत असला तरी मी आधुनिक अभिमन्यू आहे त्यामुळे चक्रव्यूहात शिरायचे कसे आणि त्यातून बाहेरही यायचे मला माहिती आहे. त्यामुळे काहीही झाले तरी मी अभिमन्य होणार नाही असे त्यांनी सांगितले.
राजकोट प्रकरणी जबाबदारी झटकली नाही
सिंधुदुर्ग राजकोट प्रकरणी माझे पूर्ण विधान ऐकले तर त्यात मी कुठेही जबाबदारी टाळली नाही. पीडब्ल्यूडीने भ्रष्टाचार केल्यामुळे हा पुतळा पडला असा मला प्रश्न विचारला तेव्हा हा पीडब्ल्यूडीने तयार केलेला पुतळा नाही नौदलाने तयार केलेला पुतळा आहे. नौदलाचा हेतूही चुकीचा असू शकत नाही. हे एकमेकांवर टाळण्याचा प्रयत्न नाही. पुतळा पडला ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. या मुळाशी जावे लागेल. त्यात कुठल्या चूका झाल्या असतील त्या सुधाराव्या लागतील आणि महाराजांचा तिथेच भव्य पुतळा उभारावा लागेल. मी कुठेही हात झटकण्याचे काम केले नाही. पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी, अजित पवार आणि मीही माफी मागितली. महाराष्ट्रातील जनतेची, शिवप्रेमींची माफी मागितली त्यामुळे कुठेही जबाबदारी झटकली नाही. ही घटना लाजिरवाणी आहे असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिले.