चंद्रपूर : केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या शनिवारी चंद्रपूरच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यानी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णांना योग्य वागणूक न देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला. पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, कोरोनाच्या नवीन उपप्रकाराला (जेएन १) घाबरण्याची गरज नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताने जगात सर्वाधिक लसीकरण केले. जागतिक आरोग्य संघटनेने याची दखल घेतली आहे. भारताने कोविडमध्ये उत्तम काम केले, असे त्या म्हणाल्या.
केंद्र सरकारने कोविडमध्ये प्रत्येक राज्याला पेकेज दिले होते. एनएचएमचे बजेट वाढवून देण्यात आले आहे. केंद्राने रुग्णांसाठी ६४ हजार कोटींचे पॅकेज ५ वर्षांसाठी दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. चंद्रपूरमध्ये एक आधुनिक प्रयोगशाळा सुरू करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. भविष्यात आरोग्याच्या दृष्टीने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील एम्ससोबत टेलिकन्सलटन्सीच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे, असे त्या म्हणाल्या.