27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रविजयाची खात्री असेल तरच उमेदवारी मिळणार!

विजयाची खात्री असेल तरच उमेदवारी मिळणार!

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवानंतर आता महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहांनी दोन दिवसांचा मुंबई दौरा केला. या दौ-यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. दरम्यान, विजयाची खात्री असेल तरच भाजपने उमेदवारी देण्याचे ठरवले असून, ज्या आमदारांवर नाराजी वाढली आहे, त्यांचे तिकीट कापण्याचे स्पष्ट संकेत बैठकीनंतर देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी जागावाटपावरून महायुतीमधील घटक पक्षांत नाराजीनाट्य रंगले. त्यातूनच जागावाटप लांबल्याने महायुतीला फटका बसला. आता अमित शहांनी येत्या निवडणुकीत सगळ््या घटक पक्षांचा मान राखला जाईल, असा शब्द देतानाच महायुती सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय, राबवल्या जाणा-या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, अशा सूचनाही दिल्या आहेत.

या बैठकीत अंतर्गत सर्वेक्षण अहवालावरही चर्चा झाली. महायुतीमधील विद्यमान आमदारांबद्दल मतदारांमध्ये नाराजी असल्यास त्या आमदारांची तिकिटे कापण्यात यावीत. मित्रपक्षांमध्ये जागांची अदलाबदल व्हावी, यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. विधानसभेला अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढतीचे अंदाज असल्याने विजयाची खात्री असलेल्यांना उमेदवारी द्या, अशा सूचना शहांनी दिल्याचे समजते.

विजयाची खात्री हाच मुख्य निकष
विजयाची खात्री हाच उमेदवारी देण्याचा मुख्य निकष असणार आहे. तुमच्या पक्षातील मंत्री, आमदार, नेत्यांच्या बैठका घ्या. महायुतीचे नुकसान होईल, अशी कोणतीही कृती, विधाने न करण्याच्या सूचना त्यांना द्या, असे आदेश शहांनी बैठकीत दिले. जनमानसात जाणारा संदेश महत्त्वाचा आहे. लोकसभा निवडणुकीत संविधान बदल आणि आरक्षणाचे मुद्दे आपल्याविरोधात गेले. विरोधकांनी यावर वातावरण तापवले. लोकसभेला केलेल्या चुका विधानसभेला टाळा, असा सल्ला शहांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR