अकोला : नागपूर हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याचा सहभाग असल्याने याप्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास आणि इतर कारवाई करताना केलेली दिरंगाई टीकेचा विषय ठरत आहे. संकेत बावनकुळे यांना वाचविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत असल्याचा आरोपही विरोधक करत आहेत. हे सर्व आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळून लावले आहेत. मी माझ्या मुलासाठी पोलिसांवर कोणताही दबाव आणत नसल्याचा दावा त्यांनी केला. ते शुक्रवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर हिट अँड रन प्रकरणात सत्ताधारी भाजप पोलिसांवर दबाव आणत असल्याच्या आरोपांचे खंडन केले. त्यांनी म्हटले की, पोलिस चौकशीवर दबाव येणार नाही. मी कधीही पोलिसांना फोन केला नाही, फक्त एकदा माहिती घेतली. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले होते. मी त्यांना सुद्धा या प्रकरणाविषयी काहीही बोललो नाही. पोलिसांनी कोणाचाही मुलगा असो माझा असो सामान्य घरातील, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी. फक्त आता एकच प्रश्न उरतो तो म्हणजे गाडी चालवणारा आणि गाडीत बसणा-यांवर कोणते गुन्हे दाखल होणार? पोलिस सध्या त्यादृष्टीने तपास करत असल्याचे चंद्रशेकर बावनकुळे यांनी म्हटले.
महायुतीतील ७५ टक्के जागावाटपावर मतैक्य झाल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. बावनकुळे कालपासून अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांचा तीन दिवस विधानसभानिहाय आढावा घेत आहेत. या जागांवर महायुतीतील तिन्ही पक्षांचे एकमत असल्याचे ते म्हणाले. ज्याचा उमेदवार चांगला त्याला जागा असे सूत्र आहे. कोणताच पक्ष कोणत्या जागेसाठी आग्रह धरणार नसल्याचे ते म्हणाले.
मोदींवर विसंबून राहल्याने फटका
भाजपचा गड असलेल्या विदर्भात आमच्याच अतिआत्मविश्वासाने लोकसभेत पराभूत झाल्याचे ते म्हणाले. आम्ही मोदी आहेत याच गोष्टींवर विसंबून राहत जास्त प्रयत्न न केल्याचे बावनकुळे यांनी मान्य केले.
राणेंच्या वक्तव्याचा विपर्यास
नितेश राणे यांचे म्हणण्याप्रमाणे या देशातील अनेक भागात मुस्लिम परिवार एकत्र राहतात. बांगलादेशातील घटनेचा आधार घेऊन काही युवा पिढी अमितभाई, मोदीजी, फडणवीसांना कापून टाकू असे व्हिडीओ व्हायरल करत आहे. त्याआधारावर नितेश राणे बोलले आहे, त्यावर आपण विचार केला. हे आपल्याला मान्य नाही. नितेश राणे यांचे वक्तव्य सरळ आहे. हिंदू विरोधी आणि देश विरोधी वागणा-या लोकांच्या आम्ही विरोधातच आहोत.नितेश राणे यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. देशविरोधी मुस्लिमांकडून काही खरेदी करू नका, असं ते म्हणाल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणावर बावनकुळे काय म्हणाले?
मराठा समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे. ज्या ठिकाणी समाज मजबूत नाही तिथे अगोदर दिले पाहिजे. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी घेतली आहे. जरांगे आणि मुख्यमंत्री हे एकत्र बसून चर्चा करणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.