28.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रकोणालाही सोडले जाणार नाही : राम कदम

कोणालाही सोडले जाणार नाही : राम कदम

मुंबई : प्रतिनिधी
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ल्यानंतर मुंबईसह बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांचे नेते मुंबईतील सामान्यांसह सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत आहेत. दुसरीकडे भाजपा नेते राम कदम यांनी कोणालाही सोडले जाणार नाही, अशी ग्वाही दिली.

अभिनेता सैफ अली खानवरील चाकूहल्ल्याची सखोल चौकशी करण्याची ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता म्हणाले, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी दरोड्याच्या प्रयत्नानंतर त्याच्यावर धक्कादायक पद्धतीने हल्ला झाला. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर ही घटना घडली आहे. त्यामुळे मुंबईत उच्चपदस्थ व्यक्तींना लक्ष्य करून वाढणा-या गुन्ह्यांबाबत चिंता निर्माण झाली आहे .

देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी- सैफ अलीवरील हल्ल्याबाबत शिवसेनेचे (यूबीटी) नेते आनंद दुबे म्हणाले, या देशात सेलिब्रिटी आणि व्हीआयपी सुरक्षित नसतील, तर सामान्य लोकांचे काय होणार आहे? यापूर्वी सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार झाला होता. त्यानंतर बाबा सिद्दीकींची हत्या झाली. आता सैफ अली खानवर चाकूने वार करण्यात आले आहेत. ही दुर्दैवी घटना आहे. मुंबईत कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी.

कायद्याचा कमी झाला धाक : राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनी या हल्ल्यावरून चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला हा चिंतेचा विषय आहे. जर त्याच्यासारख्या सेलेब्रिटी आणि कडक सुरक्षा असलेल्या लोकांवर त्यांच्याच घरात हल्ला होऊ शकतो, तर सामान्य नागरिकांनादेखील काळजी करावी लागेल. गेल्या २-३ वर्षांत महाराष्ट्रात कायद्याचा आणि पोलिसांचा धाक कमी झालेला दिसतो.

पोलिस पथकातर्फे तपासणी
हल्लेखोर आधीपासूनच होता घरात- आताच कोणत्याही निष्कर्षावर पोहोचता येणार नाही. यात अजूनही कोणता कट, कोणती योजना किंवा कुठल्या गँगचा सहभाग असल्याचे समोर आलेले नाही. आजच्या घटनेला आधीच्या दोन घटनांशी जोडणे योग्य होणार नाही. या प्रकरणी तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांतर्फे तपास करण्यात येत आहे. तपास झाल्यानंतरच याबाबत सविस्तर बोलता येईल, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR