मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या मारेक-यांना सोडणार नाही. त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात येईल जेणेकरून गुन्हेगारांना एक संदेश मिळेल असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देशमुख कुटुंबीयांना दिला. संतोष देशमुख प्रकरणात जे कुणी गुन्हेगार असतील त्यांना माफी नाही. यामागे कुणीही असेल त्याला शिक्षा मिळेल असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.
संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि न्याय मिळावा अशी मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार सुरेश धस होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले की आमच्याकडे काही गोष्टी आणि पुरावे होते ते मुख्यमंत्र्यांना दाखवले, त्यावर चर्चा केली. आमची भूमिका ही न्यायाची आहे. आम्हाला फक्त न्याय हवा. निपक्षपातीपणे तपास झाला पाहिजे. या मागे कुणीही असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आम्ही केली. एफआयआरमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, त्यामधील सर्वांचे सीडीआर तपासावे अशी मागणी आम्ही केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
या हत्येमागे कुणीही आरोपी असो, त्याला सोडणार नाही. तसेच यातून महाराष्ट्रातील गुन्हेगारी प्रवृत्तीला एक उदाहरण दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निर्घुण हत्या करण्यात आली होती. पवनचक्की खंडणीप्रकरणामध्ये ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणाशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर थेट आरोप केले आहेत. त्याचसोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी वाल्मिक कराड हाच यामागे असल्याचा आरोप केला. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्यात यावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. तसेच वाल्मिक कराड आणि त्याच्या गुंडांची कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती असून त्याची ईडीने चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.