नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भारत मंडपम येथे आयोजित विकास भारत यंग लीडर्स डायलॉग २०२५ कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी मोदींनी उपस्थित तरुणांना संबोधित करताना, देशातील तरुणांशी माझे मैत्रिचे नाते असल्याचे म्हटले. तसेच, देशातील युवा शक्तीच्या बळावरच भारत लवकरात लवकर विकसित होईल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
पीएम मोदी पुढे म्हणतात आज येथे उपस्थित तरुणांशी बोलत असताना मला विकसित भारताचे चित्रही दिसत आहे. विकसित भारतात आपल्याला काय पहायचे आहे? आपल्याला कोणत्या प्रकारचा भारत बघायचा आहे? जिथे चांगली कमाई आणि चांगल्या अभ्यासाच्या अधिकाधिक संधी असतील. फक्त बोलून आपण विकास करू का?. जेव्हा प्रत्येक निर्णयाचा निकष एकच असतो, जेव्हा आपल्या प्रत्येक पावलाची दिशा विकसित भारत असते, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती आपल्याला विकास करण्यापासून रोखू शकत नाही.
मी लाल किल्ल्यावरून १ लाख नवीन तरुणांना राजकारणात आणण्याबाबत बोललो आहे. तुमच्या सूचना अंमलात आणण्यासाठी राजकारण हेही एक उत्तम माध्यम असू शकते. मला विश्वास आहे की, तुमच्यापैकी अनेकजण राजकारणातही उतरतील. विकसित भारताच्या या प्रवासात आपल्याला रोज नवनवीन ध्येये निश्चित करायची आहेत आणि ती साध्य करायची आहेत. तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठेल. गेल्या १० वर्षांत देशाने २५ कोटी लोकांना रोजगार दिला आहे. आम्ही अनेकांना गरिबीतून बाहेर काढले. ज्या वेगाने आम्ही पुढे जात आहोत, तो दिवस दूर नाही जेव्हा संपूर्ण भारत गरिबीमुक्त होईल असेही मोदी यावेळी म्हणाले.
भारत नियोजित वेळेपूर्वीच लक्ष्य गाठणार
मोदी पुढे म्हणतात आज अनेक क्षेत्रांमध्ये भारत निर्धारित वेळेपूर्वीच आपले लक्ष्य गाठत आहे. तुम्हाला कोरोनाची वेळ आठवत असेल, जग लसीबद्दल चिंतेत होते, असे म्हटले जात होते की, कोरोनाची लस बनवायला वर्षे लागतील, पण भारतीय शास्त्रज्ञांनी वेळेपूर्वी पहिली लस बनवून दाखवले. १९३० च्या दशकात अमेरिका गंभीर आर्थिक संकटात अडकली होती, तेव्हा अमेरिकेच्या लोकांनी ठरवले की, आपल्याला त्यातून बाहेर पडून वेगाने पुढे जायचे आहे. त्यांनी तो मार्ग निवडला आणि अमेरिका त्या संकटातून बाहेर तर आलाच, पण विकासाचा वेगही अनेक पटींनी वाढला.