मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना मोठी कबुली दिली असून अपात्र लाडक्या बहिणींकडून अजिबात रिकव्हरी करणार नसल्याचे म्हटले आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांना आपले आधार कार्ड बँकेशी जोडणे अनिवार्य होते. मात्र ज्या महिलांचे आधार कार्ड योजनेचे पैसे जमा होणा-या अकाऊंटच्या बँकेशी लिंक नव्हते अशाही महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे १५०० रूपये जमा झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, यावरून विरोधकांनी सत्ताधा-यांना धारेवर धरले होते. अशातच आधार लिंक झाल्याशिवाय लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे गेल्याचे उघड झाले आहे.
मागे वेळ कमी होता त्यामुळे बहिणींचे आधार लिंक करता आले नाहीत, असे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना मोठी कबुली दिली. मागच्या वेळेला मर्यादित वेळ होता. त्यावेळी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या महिलांना आधार लिंक करायचे होते. मात्र वेळ कमी असल्याने ते करता आले नाही असे सांगत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना थेट कबुलीच दिल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता खरंच ज्यांना या योजनेचे पैसे मिळायला हवेत त्यांनाच ते पैसे कसे जातील याकरता आम्ही हळू हळू पाऊले उचलत आहोत असेही अजित पवार यांनी म्हटले.
तर मध्यंतरी लाडकी बहीण योजनेचे निकष धुडकावून ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता किंवा ज्या महिला अपात्र असताना त्यांनी अर्ज केला होता. त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे दंडाच्या रक्कमेसह वसूल केले जाणार अशी चर्चा होत होती. मात्र यावर अजित पवार यांनी रिकव्हरीचा अजिबात विचार नाही असे स्पष्ट सांगितले आहे.