परभणी : महायुती सरकारने लाडकी बहीण, तरुण वर्ग आणि शेतक-यांसाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांमुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. लाडक्या बहिणींनी खात्यात आलेले पैसे लवकर काढून घ्यावेत नाहीतर सरकार काढून घेईन असाही अपप्रचार विरोधकांनी केला. एवढ्यावरच न थांबता या योजनेसाठी पैसे कुठून आणणार असा सवाल विचारणा-या महाविकास आघाडीने आमची योजना चोरत आपल्या वचननाम्यात महिलांना प्रतिमाह ३ हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे.
आम्हाला पैसा कुठून आणणार असा प्रश्न विचारणारे विरोधक यासाठी पैसा कुठून आणणार? असा प्रतीप्रश्न विचारत आम्ही लाडक्या बहिणींना योजनेचे ५ हप्ते वाटप करून दाखवले आहेत. परंतू आमच्या योजनांची कॉपी करून कुणीही पास होऊ शकत नाही असे खडेबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना सुनावले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर परभणी येथे महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी महायुतीचे परभणी मतदार संघातील उमेदवार आनंद भरोसे, जिंतूर मतदार संघाच्या उमेदवार आ.मेघना बोर्डीकर, ज्येष्ठ नेते विजय वरपूडकर, माजी आ. हरिभाऊ लहाने, प्रताप देशमुख, राजू कापसे, बाळासाहेब जाधव, व्यंकटराव शिंदे, माणिक पोंढे, धम्मदीप रोडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमचे सरकार सत्तेवर आल्यास सर्व योजना बंद करत दोषी असणा-यांना तुरुंगात टाकू असा इशारा महाविकास आघाडीवाले देत आहेत. हिंमत असेल तर या सर्व कल्याणकारी योजनांची खुशाल चौकशी करावी. लाडक्या बहीण-भावांसाठी तसेच शेतक-यांसाठी आपण एकदा नव्हे तर शंभर वेळा तुरुंगात जाण्यास तयार आहोत असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. शिवसेनेचा प्राण असलेला धनुष्यबाण काही लोकांनी काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवून आणण्याचे काम आम्ही केले. त्याची शान वाढविण्याचे काम आता करायचे आहे असे सांगितले.
परभणीच्या स्थानिक आमदाराने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. काहीही काम करायचे नाही परंतू श्रेय लाटण्यासाठीच पुढे यायचे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणी येथील महायुतीच्या जाहीर सभेत बोलताना विरोधकांवर केला. तसेच परभणीला विकासाच्या वाटेवर नेऊन विकासाची पर्वणी साधण्यासाठी महायुती उमेदवाराच्या पाठीशी राहा असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना केले. महायुती सरकारने शेतक-यांच्या वीज बिल माफी पाठोपाठ आता १० कलमी कार्यक्रमात कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. तसेच लाडक्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला २१०० रूपये जमा केले जाणार आहेत.
विरोधकांनी आमच्या कल्याणकारी योजनांबद्दल अपप्रचार चालवला. लवकर लवकर खात्यात जमा झालेले पैसे काढा नाहीतर सरकार काढून घेईल असाही खोटा प्रचार केला. परंतू आमचे सरकार देणारे आहे घेणारे नाही. कोणी कोर्टात जाऊ दे, कोणी कुठेही गेले तरी ही योजना बंद होऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या आणि पैशांच्या राशीत लोळणा-यांना काय समजणार दीड हजाराची किंमत? असा सवाल करत त्याची किंमत केवळ लाडक्या बहिणींनाच कळते, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
यावेळी महायुतीचे उमेदवार भरोसे, ज्येष्ठ नेते वरपूडकर, माजी आ. लहाने, देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन सुनील तुरूकमाने यांनी केले. या सभेला पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.