नवी दिल्ली : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. याप्रकरणी निकाल देण्यास दिरंगाई केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच हे प्रकरण निकाली काढण्यास विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत न्यायालयाने दिली होती. परंतु, निकाल वेळेत देता येणार नसल्याने नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत शिवसेनेच्या बाबतीचा निर्णय घेण्यास सांगितले आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना आणखी दहा दिवसांची मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे आता १० जानेवारीपर्यंत त्यांना वेळ मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यात राहुल नार्वेकर यांनी याचिकेत तीन आठवडे वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने केवळ १० दिवसांचा वेळ दिला. त्यामुळे आता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.