15.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeमहाराष्ट्रबीड प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही

बीड प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही

मुंबई : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत बोलताना धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याची मागणी सपशेल फेटाळून लावली. या प्रकरणात मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कोणत्या अर्थाने संबंध नाही त्यामुळे मी राजीनामा का द्यावा याचे काही तरी कारण तर द्यावे लागेल, असा प्रतिसवाल धनंजय मुंडे यांनी आज पत्रकारांना केला. दरम्यान या हत्येचा खटला चालवण्यासाठी सरकारी वकिल अ‍ॅड उज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

बीड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव अनेक राजकीय नेत्यांनी घेतले आहे या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आज धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याबाबत विचारणा केली त्यावर वाल्मिक कराड प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही. त्यामुळे मी राजीनामा का देऊ असा सवाल केला. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. आरोपींना फासावर चढवणे हा आमचा प्रयत्न आहे. हा खटला फास्ट ट्रँक कोर्टात चालवावा, ही मागणी मी नागपूरच्या अधिवेशनात केली. त्यामुळे आरोपींवर त्वरीत आरोपपत्र दाखल करावे. आणि फास्टट्रँक कोर्टात या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. म्हणूनच हा तपास सीआयडीकडे सोपवला आहे. याची एसआयटी तसेच न्यायालयीन चौकशीही सुरु आहे.

मी मंत्री असल्याने त्या तपासाशी कोणत्याही प्रकारचा प्रभाव होऊच शकत नाही. मी राजीनामा का द्यावा, याचे काही तरी कारण तर लागेल. या प्रकरणात मी ना आरोपी आहे, ना माझा या प्रकरणाशी कोणत्याही अर्थाने संबंध नाही. या प्रकरणात आऊचा बाऊ करायचा आणि कोणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पध्दतीने काही जण माझा राजीनामा मागत आहेत, असे धनंजय मुंडे म्हणाले.

मुंडेंनी राजीनामा द्यावा
वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे.त्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आम्ही हीच मागणी केल्याचे सांगितले.

उज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी
भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीड हत्या प्रकरणात सरकारी वकिल म्हणून अँड. उज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली आहे. त्यावर या खटल्यात उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याबाबतचे निवेदन सुरेश धस यांनी मला दिलेले आहे. त्यानंतर मी उज्वल निकम यांना फोन करून खटला चालवण्याची विनंती केली आहे. त्यांनी एक-दोन दिवसांची मुदत मागितली आहे कारण त्यांच्याकडे सध्या इतर खटल्यांचे काम सुरु आहे बीडच्या केसमध्ये अधिक वेळ द्यावा लागणार आहे. सध्याच्या केसेसचा आढावा घेऊन ते त्यांचा निर्णय कळणार आहेत. उज्वल निकम यांनी होकार दिला तर निश्चितपणे त्यांची या खटल्यात नियुक्ती केली जाईल.

अँड. देशपांडे यांचा खटला चालवण्यास नकार !
वाल्मिक कराड यांचा खटला चालवण्यासाठी सरकारी वकिल अँड. एस. एस. देशपांडे यांनी का नकार दिला याची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली या प्रकरणात चौकशीसाठी स्वतंत्र वरिष्ठ अधिका-याची नियुक्ती करावी. तसेच हा खटला बीड सोडून पुणे,नगर किंवा संभाजीनगरमध्ये चालवला पाहिजे. कारण ज्या ठिकाणचे पोलिस तपास करायला तयार नाही, आरोपींसोबत उठबस करतात. अशा पोलिसांकडे तपास दिला तर स्टोरी एका फ्रेममध्ये बसवण्यात आली आहे असे ते म्हणाले.

कराड-मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कित्येकवेळा पोलिस अधिकारी आणि कलेक्टरना धनंजय मुंडे नाही तर वाल्मिक कराड आदेश देत होता. कराडचा आदेश म्हणजे मुंडेंचा आदेश असे बीडमध्ये समजले जाते. मुंडे यांच्या खात्यामध्येही तसेच आदेश देण्यात येत होते.

सीडीआर जाहीर करा
पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये काय आहे, कोणाचे फोन आले याचे सीडीआर अजूनही पोलिसांनी जाहीर केलेला नाही. हे सर्व जाहीर करावे. यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाठिंबा असणारे यात आरोपी झाले पाहिजेत त्या तीन तासात काय झाले झाले ते बाहेर येण्याची आवश्यकता अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR