22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयमोदींसोबत नाही, त्याला जेलमध्ये टाकण्याचे धोरण

मोदींसोबत नाही, त्याला जेलमध्ये टाकण्याचे धोरण

नवी दिल्ली : कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने हेमंत सोरेन यांच्यावर अखेर अटकेची कारवाई केली आहे. ईडीकडून अटकेच्या हालचाली सुरू झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे जात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देऊन सोरेन हे घरी पोहोचताच ईडीने त्यांना अटक केली. यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. जे लोक पंतप्रधान मोदी यांच्यासोबत नाहीत, त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले जात आहे, असे सांगत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रावर निशाणा साधला.

मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये मोदींसोबत नाही, त्याला जेलमध्ये टाका हेच सुरू आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजीनामा द्यायला भाग पाडणे हे संघराज्य पद्धतीला धक्का लावण्यासारखे आहे. पीएमएलए कायद्याच्या तरतुदी चुकीच्या पद्धतीने कठोर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना भीती घालणे, धमकावणे हे सर्व भाजपाच्या टूलकिटचा भाग आहे. कट-कारस्थान करून विरोधी पक्षाच्या सरकारना कमकुवत करण्याचे काम भाजपा करत आहे. भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये जो गेला, स्वच्छ चारित्र्याचा आणि भाजपासोबत न जाणा-यांवर विविध आरोप करून प्रतिमा डागाळण्याचे काम केले जात आहे. या हुकुमशाही प्रवृत्तीपासून लोकशाही वाचवायची असेल तर भाजपाला पराभूत करणे हाच पर्याय आहे. आम्ही घाबरत नाही. रस्त्यांपासून संसदेपर्यंत लढत राहू, या शब्दांत मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्लाबोल केला.

लोकशाही संपविण्याचे अभियान : राहुल गांधी
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपावर टीका केली आहे. ईडी, सीबीआय, आयटी या आता सरकारी संस्था राहिलेल्या नाहीत, आता त्या भाजपाच्या विरोधी पक्षांना संपविण्याच्या संस्था बनल्या आहेत. भ्रष्टाचारात बुडालेला भाजपाच सत्तेच्या नशेत लोकशाही नष्ट करण्याचे अभियान राबवत आहे, या शब्दांत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले.

झारखंडमध्ये राजकीय संकट
हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला असला आणि राज्यपालांनी तो मंजूर केला असला तरी सध्या झारखंडच्या काळजीवाहू मुख्यमंत्रिपदी तेच आहेत. घटनात्मकदृष्ट्या हे पद रिक्त राहणे योग्य नसल्याने जोपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत नाही, तोपर्यंत ते या पदावर राहतील. या सर्व घडामोडींमुळे झारखंडमध्ये राजकीय संकट उभे राहिले आहे. हेमंत सोरेन हे राजीनामा देणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाने नवे मुख्यमंत्री म्हणून चंपई सोरेन यांचे नाव निश्चित केले. तसेच राज्यपालांकडे सरकार बनवण्यासाठीचा दावाही सादर केला होता. मात्र राज्यपालांनी नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR