मुंबई : लोकसभा निवडणुकीत जशी चुरशीच्या लढतींची चर्चा झाली, तशीच चर्चा ‘नोटा’वर पडलेल्या मतांचीही सुरू आहे. ‘नोटा’ला देशात ०.९९ टक्के मते मिळाली. देशात नोटाला सर्वाधिक मते बिहारमध्ये मिळाली. तर, महाराष्ट्रात ०.७२ टक्के मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केले. राज्याचा विचार करता रायगडमधील मतदारांनी ‘नोटा’ला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
सप्टेंबर २०१३ मध्ये एका याचिकेवर सुनावणी कर
ताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ईव्हीएमवर ‘नोटा’ पर्याय देण्याचा आदेश दिला होता. २०१३ मध्ये त्यानुसार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी कोणाला पसंती नसल्यास ईव्हीएममध्ये ‘नोटा’ चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. २०१३ मध्ये भारतातील मतदान प्रक्रियेत ‘नोटा’चा पर्याय प्रथमच वापरण्यात आला होता.
२०१९ च्या तुलनेत ‘नोटा’चा वापर कमी
देशात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमवर ‘नोटा’ पर्यायाला ४ लाख ३३ हजार १७१ मतदारांनी पसंती दिली होती. हा आकडा एकूण मतांच्या ०.८९ टक्के होता. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी या पर्यायाचा अधिक वापर केला. २०१९ च्या निवडणुकीत ४ लाख ८८ हजार ७६६ मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केले होते. एकूण मतदानाच्या हे प्रमाण ०.९ टक्के होते. तर, यावेळी म्हणजेच २०२४ च्या निवडणुकीत ४ लाख १२ हजार ८१५ मतदारांनी ‘नोटा’ बटनाचा वापर केला. याचे एकूण प्रमाण ०.७२ टक्के आहे. तसेच २०१९ च्या तुलनेत नोटा बटनाचा वापर कमी झाल्याचे दिसून येत आहे.