मुंबई (प्रतिनिधी) : कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे सरकारकडून सांगितले जात होते. याला आमचा अजिबात विरोध नव्हता; परंतु सरकारने ओबीसीच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम केलं आहे. मंत्रिमंडळालाही विश्वासात न घेता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला.
ओबीसी संघटनांची बैठक विजय वडेट्टीवार यांनी आज बोलावली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारवर तिखट शब्दात टीका केली. मंत्रिमंडळालाही विश्वासात न घेता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या २० फेब्रुवारीला संभाजीनगर येथे ओबीसींच्या विराट सभेचे आयोजन केले आहे. ही सभा ओबीसींच्या संविधानिक हक्काच्या रक्षणासाठी आहे. आरक्षण देण्यावरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असून या लढाईमुळे ओबीसी समाजाला उद्ध्वस्त करण्याचे पाप सरकारकडून केले जात आहे. आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोधी नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण देण्यास आमची हरकत नाही मात्र सगेसोयरे शब्दामुळे ओबीसी आरक्षणात कोणाचाही शिरकाव होऊ शकतो. अटी शिथिल केल्यामुळे कोणालाही प्रमाणपत्र मिळू शकते. हे चुकीचे आहे. सरकार एकाच समाजाचे हित पाहत आहे. सरकारची ही अडेलतट्टूपणाची भूमीका ओबीसी समाजाला खड्ड्यात घालणारी आहे. आजवर एकत्र राहणा-या समाजाला एकमेकांचे वैरी करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.