25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रआता उत्कंठा निकालाची

आता उत्कंठा निकालाची

पुणे : विनायक कुलकर्णी
पुणे : प्रतिनिधी
जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांतील निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. आता सा-यांचे लक्ष येत्या दि. ४ जून रोजी जाहीर होणा-या निकालाकडे लागले आहे. जिल्ह्यातील चारपैकी महायुती आणि महाविकास आघाडीकडे किती जागा येणार याबाबत विलक्षण उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार जागा लोकसभेच्या आहेत. या चारही जागांवर उत्कंठावर्धक लढती झाल्या आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर कोणाचे वर्चस्व राहणार हे निकालाने सिद्ध होणार आहे. कारण यावरच आगामी काळात होणा-या विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती अवलंबून असणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन मोठ्या राजकीय पक्षातील फुटीनंतर जिल्ह्यातील एकूणच राजकीय चित्र बदलले आहे. या बदलाचा नेमका काय परिणाम झाला हे निकालावरून अधिक स्पष्ट होणार आहे.

निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान आणि जाहीर सभांच्या माध्यमातून परस्परांवर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले, टीकेची झोड उठविण्यात आली. पण प्रत्यक्षात चारही लोकसभा मतदारसंघांत ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले नाही ही वस्तुस्थिती आहे. काही कारणे म्हणजेच वाढते ऊन, अवकाळी पाऊस, त्याचप्रमाणे मतदारांची नावे मतदार यादीत नसणे आणि सलग तीन दिवस सुट्या यासारखी अनेक कारणे असतील. याबरोबरच दोन राजकीय पक्षांतील विभाजन आणि त्यामुळे काही प्रमाणात असणारी सहानुभूतीची भावना याचा देखील काही प्रमाणात परिणाम झाला असे म्हणावेसे वाटते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न काही ठिकाणी जाणवला आहे.

आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय चित्र कसे असणार याबाबत विविध मुद्दे, शक्यता वर्तविण्यात येत आहेत. त्याचे कारण असे की येत्या चार ते पाच महिन्यांत विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे त्यामुळे लोकसभेच्या चारही मतदारसंघांतील राजकीय चित्र पुढील आठवड्यात म्हणजेच निकालानंतर कसे असणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. चारही लोकसभा मतदारसंघांतील विधानसभा मतदारसंघाचा कल कसा असणार आहे याबाबतची गणिते मांडली जात आहेत. याबाबतीत दोन्ही बाजूंनी म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडीकडून दावा करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत तीन विद्यमान खासदार आणि एक माजी खासदार पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहेत तर तीन उमेदवार लोकसभेची निवडणूक प्रथमच लढवित आहेत. त्यामुळे मतदारांचा कल कोणाच्या बाजूने असेल हे पुढील आठवड्यात स्पष्ट होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR