22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रआता शाळा, कॉलेज,ऑफीसमध्ये घुमणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’

आता शाळा, कॉलेज,ऑफीसमध्ये घुमणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’

मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील सर्व शासकीय आस्थापनेत राज्य गीत लावण्याचे आदेश जारी करा, अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयात हे आपले ‘राज्यगीत’ लावण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात यावा अशी विनंती अमित ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.

शासकीय परिपत्रकानुसार, राज्यातील प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात अध्ययन वर्ग सुरू होण्यापूर्वी ‘‘जन गण मन अधिनायक जय हे’’ ह्या आपल्या राष्ट्रगीताचे गायन करणे अनिवार्य आहे. राष्ट्रगीताचा मान राखण्याबाबत शालेय स्तरापासून ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक संस्कार केले जातात, त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राच्या राज्य गीताचे महत्व भावी पिढ्यांना- विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी आणि त्यांना आपल्या अत्यंत प्रेरणादायी राज्य गीताचा उचित सन्मान राखण्याची सवय लावण्यासाठी प्रत्येक शाळा तसेच महाविद्यालयात राज्य गीताचे गायन अनिवार्य करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयांत प्रवेश करताच विद्यार्थी सहज वाचतील अशा ठिकाणी म्हणजे शैक्षणिक संस्थेच्या इमारतीच्या दर्शनी भागात एका मोठ्या फलकावर अथवा भिंतीवर ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे संपूर्ण राज्य गीत लिहून त्याला कायमस्वरुपी ठळक प्रसिद्धी देण्याचे आदेश आपण सर्व शैक्षणिक संस्थांना द्यावेत. त्याच प्रमाणे, बांद्यापासून चांद्यापर्यंतच्या प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या दर्शनी भागातही आपले राज्य गीत लावण्यात यावे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR