25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रआता अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण

आता अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण

पुणे : प्रतिनिधी
उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली असताना आता येत्या शैक्षणिक वर्षात पूर्वप्राथमिक स्तरावरही धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके राज्यातील १ लाख ३१ हजार अंगणवाड्यांना पुरवली जाणार आहेत.

आतापर्यंत पूर्वप्राथमिक शिक्षणाचा समावेश औपचारिक शिक्षणात करण्यात आला नव्हता. त्यामुळे अक्षरांची तोंडओळख, गाणी, गोष्टी, खेळ अशा स्वरूपात शैक्षणिक प्रक्रिया चालत होती. मात्र, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शैक्षणिक चौकटच बदलण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वप्राथमिक शिक्षणाचा औपचारिक शिक्षणात समावेश झाला आहे. पूर्वप्राथमिक शिक्षणात पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान महत्त्वाचे मानण्यात आले आहे. या अनुषंगाने धोरणात प्रस्तावित केल्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) पूर्वप्राथमिक किंवा पायाभूत स्तरासाठीचा अभ्यासक्रम आराखडा तयार केला.

या आराखड्यानुसार राज्य स्तरासाठीच्या अभ्यासक्रमाची राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) निर्मिती केली आहे तर बालभारतीकडून पाठ्यपुस्तकांची निर्मिती, छपाई करून अंगणवाड्यांना पुस्तके वितरित केली जाणार आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणातील होत असलेल्या बदलांपाठोपाठ आता पूर्वप्राथमिक स्तरापासूनचे बदल सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पूर्वप्राथमिक स्तरावर अंमलबजावणी
येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची राज्यातील पूर्वप्राथमिक स्तरावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात शासकीय अंगणवाड्यांपासून केली जाणार आहे. त्यात १ लाख ३१ हजार अंगणवाड्यांना अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके पुरवली जाणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR