14.2 C
Latur
Friday, November 21, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरआता मैदान मोकळे, बघू कोण येते?

आता मैदान मोकळे, बघू कोण येते?

संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान

जालना : माझ्या हत्येच्या कटातील मुख्य सूत्रधाराला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पूर्ण ताकद लावत आहेत असा अत्यंत गंभीर आरोप करत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सरकारवरचा पूर्ण विश्वास उडाल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी गुरुवारी (२० नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी बोलताना आपण दिलेले पोलीस संरक्षण नाकारल्याचे स्पष्ट केले.

जरांगे यांनी बुधवारी पोलिस अधीक्षकांना अर्ज देऊन पोलीस संरक्षण काढण्याची मागणी केली होती. गुरुवारी त्यांनी याची अंमलबजावणी केली. आम्ही काल अर्ज दिला आणि अंगरक्षकांना (पोलिसांना) सांगितले, तुम्ही सोबत येऊ नका. आज पोलिस सोबत येऊ दिले नाही. तुम्ही आतापर्यंत सेवा दिली, त्याबद्दल सर्व पोलीस बांधवांचे मनापासून सन्मान करतो असे भावनिक विधान करत त्यांनी पोलिसांना गाडीतही बसू दिले नाही आणि सोबतही घेतले नाही. जीवन जगत असताना खोटे वागायचे नाही, त्यामुळे आम्हाला सरकारने दिलेले पोलीस संरक्षण नको, कारण आमचा सरकारवरचा पूर्ण विश्वास उडाला आहे असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

धनंजय मुंडेंसह फडणवीस-पवारांवर थेट निशाणा
जरांगे यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर आपला घातपात करण्याचा कट रचल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करत, फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर तोफ डागली. एवढा मोठा घातपाताचा कट धनंजय मुंडेकडून होत आहे, त्याला वाचवायचे काम अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस करत आहेत असे म्हणत जरांगे यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला पाठबळ दिल्याबद्दल अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना १००% जबाबदार धरले आहे.

आता आम्ही आमचे बघू
माझ्या हत्येच्या कटातील मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे आहे, आता आम्ही आमचे बघू. आता मैदान मोकळे आहे, येऊ द्या त्याचे कोण कोण यायचे ते. बघू आम्ही. आता अंगावर आल्यावर वापस कसे जातात! आता जे आरोपी पकडलेले आहेत, ते स्पष्टपणे त्याला (धनंजय मुंडे) बोललेले आहेत. फोनवरती सगळे कट रचलेले आहेत. तो कोण बडा आहे, तो अजून धरलेला नाहीे. हे सगळे मोठे षडयंत्र रचण्यात आले होते असे जरांगे म्हणाले. माजी मंत्री आणि आमदार आहे म्हणून तुम्ही सोडून देणार का? नसता त्याला चौकशीसाठी पाठवलं असते, त्याला अटक केली असती असा सवाल त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR