21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रआता तुम्ही राजकीय भूमिका घ्या; प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

आता तुम्ही राजकीय भूमिका घ्या; प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

मुंबई : मनोज जरांगे-पाटील आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करत आहेत, असे जरांगे-पाटील म्हणाले होते. यावर प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुमची भाषा आता राजकीय झाली आहे. त्यामुळे आता तुम्ही राजकीय भूमिका घ्या, असे आवाहन दरेकर यांनी केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

मनोज जरांगेंनी राजकीय भूमिका घ्यावी. कारण ते आता राजकीय बोलत आहेत. मराठ्यांच्या हिताची आम्ही नेहमीच भूमिका घेत असतो. मराठा तरुण-तरुणींसाठी गेल्या १० ते १५ वर्षांपासून काम करत आहोत. तुम्ही भावनिक करून मराठा समाजाला राजकारणात ओढू नका. भूमिका नीट ठेवा आम्ही सोबत आहोत, असे दरेकर म्हणाले.

आता तुमच्या भूमिकेला राजकीय वास यायला लागला आहे. तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायथ्याची बसता अन् प्लॅनिंग काय तर कुणाला पाडायचे अन् कुणाला उभे करायचे. असेच करणार असाल तर खुली राजकीय भूमिका घ्या. मराठा समाजाच्या भावनांचा अशा प्रकारे राजकारणासाठी उपयोग करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

आता मराठा समाजाला हे कळू लागले आहे. आपल्या आंदोलनाचे राजकारण होतेय हे लोकांना समजत आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही मराठ्यांना आरक्षण दिले आहे. कोर्टामध्ये ते टिकवण्याची हमी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. सगेसोय-यांबाबत प्रक्रिया सुरू आहे. कागदपत्रांचा अभ्यास सुरू आहे. सरकार डोळे मिटून गप्प नाही, असे ते म्हणाले.

मनोज जरांगे राजकीय पोळी भाजून घेत आहेत याचे आम्हाला दु:ख झाले आहे. मराठ्यांच्या भावनांचे राजकीय दुकान मांडू नका, हीच अपेक्षा आहे. बाकी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्या प्रामाणिकपणाबाबत आदर आहे. त्यांचा कोणी वापर करू नये. त्यांच्यामार्फत कोणाचा अजेंडा राबवला जाऊ नये अशीच आमची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR