28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात परिचारिका संपावर

राज्यात परिचारिका संपावर

आरोग्य यंत्रणा सलाईनवर

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील परिचारिकांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. निवृत्तिवेतन आणि निवृत्तीचे वय वाढवण्याच्या मागणीसाठी हा संप सुरू केला आहे. या संपात पुणे जिल्ह्यातील एक हजार परिचारिका सहभागी झाल्या आहेत.

राज्यात ठिकठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या संपामुळे पुणे जिल्ह्यासह राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिकांनी आंदोलन सुरू केले आहे. घाटी रुग्णालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. सर्व शासकीय रुग्णालयांतील परिचारिकांनी संपामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर आली आहे.

राज्यात परिचारिकांनी पुकारलेल्या संपामुळे आरोग्य विभागाने पर्यायी व्यवस्था सुरू केली आहे. जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व वर्ग चारचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. यामुळे नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना बोलवण्यात आले आहे. अनेक शासकीय रुग्णालयांत नर्सिंगच्या विद्यार्थ्यांवर काम सुरू करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे परिचारिक आणि कंत्राटी कर्मचा-यांची मदत घेतली जात आहे.

मुंबईत कर्मचा-यांचे आंदोलन
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे बैठक झाली. या बैठकीतून काही साध्य न झाल्याने कर्मचारी आंदोलन आज सुरू केले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेलेले आहेत. जवळपास १७ लाख कर्मचा-यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.

जे. जे. रुग्णालयात आंदोलन
राज्य सरकारने मागील सहा महिन्यांपासून कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. आम्ही राज्य सरकारला बराच अवधी दिला. त्यानंतरही आमची मागणी मान्य झाली नाही. यामुळे आमच्या न्याय्य हक्कासाठी आम्हाला आंदोलनाला सामोरे जावे लागत आहे, असे कर्मचा-यांनी सांगितले. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात मुंबईतील जे. जे. रुग्णालय येथे आंदोलन करण्यात आले. आज सर्व हॉस्पिटलमधील कर्मचारी संपावर गेल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. आता जोपर्यंत आमच्या मागण्या लिखित स्वरूपात मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचा बेमुदत संप सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR