मुंबई : आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध पातळ्यांवर कुष्ठरोग निर्मूलनासाठी होणा-या प्रयत्नांमधून नवीन कुष्ठरुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील तीन वर्षांत सातत्याने या शोध मोहिमेत कुष्ठरुग्णांची संख्या वाढत असून या कुष्ठरुग्णांसाठी उपचारादरम्यान पोषण आहार देण्याचा निर्णय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे. प्रतिकुष्ठरुग्ण ५०० रुपये पोषण आहार देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
कुष्ठरोग निर्मूलनासाठी विविध पातळ्यांवर आग्रही प्रयत्न होत असले तरीही समाजामध्ये या आजारासंदर्भात असलेली भीती, गैरसमज यामुळे हा आजार आजही संपुष्टात आलेला नाही. कोरोना संसर्गानंतर या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. आरोग्यसेवा (कुष्ठरोग आणि क्षयरोग) विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार २०२१-२२ मध्ये १४,५२० कुष्ठरुग्ण आढळून आले. २०२२-२३ मध्ये यात वाढ होऊन १९,८६० कुष्ठरुग्णांच्या नोंदी करण्यात आल्या असून २०२३-२४ च्या डिसेंबरपर्यंतच्या शोधमोहिमेत २० हजार कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. नवीन शोधलेल्या रुग्णांचे प्रमाण हे अनुक्रमे ९.५५ टक्के, ११.१४ टक्के व १५.५८ टक्के एवढे आहे. नवीन शोधलेल्या कुष्ठरुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाणही मागील तीन वर्षांत वाढलेले आहे तर महिलांमधील नवीन रुग्णांच्या प्रमाणातही मोठी वाढ दिसते आहे.
बहुतेक कुष्ठरुग्ण हे गरीब सामाजिक व आर्थिक स्तरावरील असल्यामुळे तसेच उपचारात सातत्य राहावे यासाठी या रुग्णांना उपचारादरम्यान पोषण आहार देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. कुष्ठरुग्णांपैकी मल्टीबॅसिलरी (एमबी) कुष्ठरुग्णांवरील उपचार हे १२ महिने केले जातात तर पॅसिबॅसिलरी रुग्णांवरील उपचार हे सहा महिने केले जातात.
एक लाख लोकांमागे १० पेक्षा जास्त कुष्ठरोगी
रायगड, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, धाराशिव, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा येथे दर दहा हजारी एकापेक्षा जास्त कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत तर नवीन शोधलेल्या कुष्ठरुग्णांचे प्रमाण दर एक लाख लोकांमागे १० पेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये रायगड, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सातारा, परभणी, हिंगोली, धाराशिव, नांदेड, वाशीम, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा यांचा समावेश आहे