बीड : कोड नंबर देऊन विचारपूर्वक प्लॅँनिंग करुन जाळपोळ झाली, असा आरोप मंत्री छगन भुजबळह्याांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यात केला. बीडमध्ये जाळपोळ झाली तेव्हा काही मुस्लिम बांधवांनी लोकांना वाचवलं असल्याचं भुजबळांनी म्हटलं. त्यातील काही लोकांचा सत्कार देखील भुजबळांनी यावेळी व्यासपीठावर केला. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला.
गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्नच निर्माण झाला नसता, असं ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यात म्हटलं. बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला.
जरांगेंवर हल्लाबोल
तीन कोटी मराठा समाजाला मुंबईत घेऊन जाणार, असं उपोषणकर्ते सांगतायत. तुम्ही फिर फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये झोपणार. दोन, चार मिटींगा घेणार. अजित पवार इतकंच म्हणाले की, तुम्ही कायदा पाळा. त्यांच्यावर कीती घाणेरड्या शब्दांत टीका करण्यात आली. एवढी मस्ती कुठून आली तुला, असं म्हणत छगन भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल केला.
रोहित पवार जरांगेला बघायला गेले
संदीप क्षीरसागर, रोहित पवार हे दुस-या दिवशी जरांगेला भेटायला हॉस्पिटलला गेले, ते कशाला गेले असा सवाल देखील भुजबळांनी यानिमित्ताने उपस्थित केला.
इतिहासात कुठेही म्हटलं नाही, की शिवाजी महाराज मराठ्यांना घेऊन लढले. इतिहासात शिवाजी महाराज मावळे घेऊन लढले,असंच म्हटलंय. आता हेच त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आम्हाला शिवीगाळ करतायत, आमची लायकी काढतायत, असं म्हणत भुजबळांनी हल्लाबोल केला.
अधिकार सोडणार नाही
मी सरकारला सांगतो की, कुठेही ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही जबाबदारी सरकारचीच असल्याचं म्हणत भुजबळांनी सरकारला इशारा दिला. त्यांच्यासाठी सगळं करता, आमची केस सुरु आहे. त्यामुळे ओबीसींना धक्का लागता कामा नये. आम्ही कायदा हातात घेणार नाही, पण संविधानाने जो अधिकार दिलाय, तो घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही.