मुंबई : मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणा-या कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचे लोकार्पण १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह या १० किलोमिटर रस्त्याचे लोकार्पण केलं जाणार आहे. तसेच, १५ मेपर्यंत दोन्ही फेज सुरू होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.
मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प तितकाच खर्चिक आहे. या रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास २९ किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे.
संपूर्ण दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी १२,७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तीन इंटरचेंज आहेत. पहिला इंटर चेंज एमर्सन गार्डन, दुसरा इंटर चेंज हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळी येथे आहे. इंटरचेंजच्या दरम्यान पार्किंग व्यवस्था भूमिगत असणार आहे. जिथे 1600 वाहने पार्क केले जातील. संपूर्ण कोस्टल रोड हा आठ पदरी असेल तर बोगद्यातील मार्ग हा सहा पदरी असेल. भराव टाकलेल्या जागेवर सौंदर्यीकरण आणि इतर प्रस्तावित छोटे-मोठे प्रकल्प आहेत, ज्यामध्ये गार्डन, सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक तयार केला जाणार आहे.