करमाळा : करमाळा तालुक्यातील केम येथील एका अल्पवयीन तरुणाने सोशल मिडीयावर महापुरुषांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी दिवसभर तणाव निर्माण झाला होता. आरोपीच्या अटकेसाठ ग्रामस्थांनी गावबंद करत शिवशंभो वेशीवरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन के ले. आरोपीच्या अटकेशिवाय वा त्याने प्रत्ययक्ष माफी मागितल्याशिवाय आंदोलन माघार घेणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केल्याने गावात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, संतप्त झालेल्या जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी चोख मोठा बंदोबस्त ठेवला होता. केम येथील एका अल्पवयीन युवकाने सोशल मीडियावर महापुरषांविषयी दोन दिवसापूर्वी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती, ती कुणाच्याच लक्षात आली नव्हती. पंढरपुरातील युवकांच्या लक्षात हि गोष्ट आल्यानंतर त्यांनी केम येथील युवकांना याची माहिती दिली. ही माहिती समजताच गावात तणाव निर्माण झाला. बघता बघता सर्व गावएकवटून शिवशंभो वेशीवरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या केला. याची माहिती समजताच पोलीसांनी मोठ्या फौजफाट्यासह चोख बंदोबस्त लावला. पण ग्रामस्थांनी गाव बंद करून आरोपीला अटके शिवाय आंदोलन माधार घेणार नसल्याचा इशारा दिला. त्यामुळे पोलिसांची मोठी कोंडी झाली. पोलिसांनी संबंधित अल्पवयीन आरोपीला करमाळा येथून अटक केली, पण त्यावर ग्रामस्थांचे समाधान झाले नाही.
आरोपीला समोर आणून माफी मागितल्याशिवाय इथून उठणार नसल्याचे सांगितले. पोलिसांची यामुळे मोठी कोंडी झाली. वारंवार समजावले तरीही ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहील्याने तणाव वाढला. शेवटी प्रशासकीय व पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी भेट दिली. यामध्ये डिवायएसपी अजित पाटील यांच्यासह प्रांताधिकारी, तहसिलदार यांनीही ग्रामस्थांना समजाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.